मुंबई : गेल्या वर्षी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर हिवाळी आणि अर्थसंकल्पीय अधिवेशन अत्यंत वादळी झाले होते. त्या अधिवेशनात विरोधी पक्ष नेते म्हणून अजित पवार यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. मात्र आता विरोधी पक्ष नेताच सरकारमध्ये सामील झाल्यामुळे पावसाळी अधिवेशनात विरोधकांची आक्रमकता कमी होऊ शकते, असे मत राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केले आहे.
विरोधकांचा चहापानावर बहिष्कार : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून विरोधकांना चहापाण्याचे आमंत्रण देण्यात आले होते. मात्र विरोधकांनी या चहापानावर बहिष्कार टाकला आहे. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार तसेच मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री व महायुतीतील सर्व पक्षांचे आमदार उपस्थित होते.
'घटनाबाह्य सरकारच्या चहापानात रस नाही' : विरोधी पक्षांची विधानभवनात बैठक झाल्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. घटनाबाह्य सरकारच्या चहापानात आम्हाला रस नसल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी म्हटले.
विरोधी पक्ष नेताच सत्तेत गेला : शिंदे फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या हिवाळी आणि पावसाली अधिवेशनात तत्कालीन विरोधीपक्ष नेते अजित पवार, छगन भुजबळ, अमोल मिटकरी, धनंजय मुंडे यांनी सरकारला अनेक मुद्द्यांवर धारेवर धरले होते. अजित पवार यांनी राज्यातील वाढत्या शेतकरी आत्महत्या, पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान, महसूल विभागातील बदली घोटाळा, राज्यातील कायदा सुव्यस्था अशी अनेक मुद्दे मांडून सरकारला घेरले होते. तसेच केंद्राकडे असलेल्या जीएसटीच्या पैशांचा मुद्दा व मुंबई महापलिकेमधील कंत्राटावरून शिंदे सरकारला लक्ष केले गेले होते. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक आक्रमक चेहरे सत्तेत बसल्यामुळे विरोधी पक्षांची आक्रमकता कमी होणार असल्याचे चिन्ह आहेत. त्यामुळे सोमवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी भारी पडतात की विरोधक हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :