मुंबई: २०१९ विधानसभा निवडणुकीच्या नंतर भाजप- शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत असून सुद्धा शिवसेनेने अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाबाबत भाजप सोबत खो घालत, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जाण्याचा निर्णय घेऊन राज्यात महाविकास महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले व भाजपला विरोधी पक्षात बसावे लागले. भाजपने २०२४ च्या विधानसभा निवडणुकीच्या दिशेने पूर्ण तयारी करत २०२४ ला पूर्ण बहुमताने सत्तेत येण्याचा निर्धार केला होता. परंतु शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीने भाजप आता पुन्हा अडीच वर्षातच सत्तेत आली आहे.
चंद्रकांत पाटलांची मंत्रिमंडळात वर्णी? : देवेंद्र फडणवीस हे दहा वर्षांपूर्वी भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर महाराष्ट्रात सर्व दूर पोहोचले. त्यानंतर ते मुख्यमंत्री झाले व महाराष्ट्र भाजपला एक तरुण व आक्रमक चेहरा भेटला. मात्र त्यानंतर त्यांची पकड ही महाराष्ट्रात न राहता दिल्लीपर्यंत पोहोचली. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने अचानक माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री पद स्वीकारण्याचा आदेश देत मोठा धक्का दिला. तसेच भाजप- शिवसेना युती मध्ये महसूल मंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशा दोन महत्त्वाच्या खात्यांचे मंत्रिपद भूषवलेले चंद्रकांत पाटील यांना नवीन मंत्रिमंडळात सुद्धा मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एक व्यक्ती एक पद? : भाजपमध्ये एक व्यक्ती एक पद हे सूत्र असल्याकारणाने चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष पदावरून पायउतार झाल्यावर त्यांना मंत्रिमंडळात महत्वाचे खाते दिले जाणार आहे. त्यामुळे आता त्यांच्या जागी नवीन तरुण चेहऱ्याला संधी देण्याची शक्यता भाजपकडून वर्तवली जात आहे. यासाठी आमदार आशिष शेलार, त्याचबरोबर आमदार राम शिंदे या दोघांची नावे चर्चेत आहेत. या सरकारमध्ये देवेंद्र फडवणीस हे भाजपचे प्रमुख असतील त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदी बहुजन समाजातील एखादा तरुण व आक्रमक नेता असावा. भाजप संघटनेतील अंतर्गत खाच्या खोचा जाणणारा व केंद्रीय नेतृत्वाशी संवाद असलेला नेता असावा, असा विचार सुद्धा सुरू झाला आहे.