मुंबई: राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे. अधिवेशनात विरोधक आज आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेत अजित पवार यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राज्य सरकारला धारेवर धरले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी त्यांनी मागणी केली आहे.
विरोधकांचे अनोख्या पद्धतीने आंदोलन: विरोधी पक्षनेते अजित पवार त्याच बरोबर विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आज विधान भवनांच्या पायऱ्यांवर बसून सरकार विरोधात घोषणाबाजी सुरू केली. विशेष करून कांदा व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळालाच पाहिजे, अशी मागणी करत कांदा व कापसाच्या माळा गळ्यात घालून यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली.
अध्यक्षांनी प्रस्ताव फेटाळला: राज्यातील शेतकऱ्यांवर सरकार अन्याय करीत असल्याने शेतकऱ्यांना तातडीचा दिलासा देण्यात यावा, यासाठी सर्व कामकाज बाजूला ठेवून चर्चा करावी, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज सभागृहात केली. मात्र हा स्थगन प्रस्ताव विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी फेटाळून लावला. कांदा उत्पादक शेतकऱ्याला तर दोन रुपये चेक दिल्याची बाब, आम्ही राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिली आहे. राज्य सरकारने यावर तातडीने हस्तक्षेप करुन नाफेडसारख्या संस्थांना शेतमाल खरेदी करण्याच्या सूचना द्याव्यात व केंद्र सरकारशी समन्वय साधून हा प्रश्न मार्गी लावावा, असेही अजित पवार म्हणाले.
शेतमालाला योग्य भाव द्यावा: राज्यातल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी अजित पवार यांनी प्रश्न उपस्थित करत मागणी केली की,महाराष्ट्र हे भारतातील मोठ्या प्रमाणावर कांदे पिकवणारे राज्य आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्राचा ३३ टक्के वाटा असून कांदाची प्रत चांगली असल्याने निर्यातीमध्ये सुध्दा महाराष्ट्र राज्य अग्रेसर आहे. सध्या कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी फक्त ५०० ते ६०० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी संकटात आला आहे. कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरलेले आहे व त्यांनी यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान: कांद्याच्या दराबाबत शासनाविरोधात राज्यात अनेक ठिकाणी रास्ता रोको आंदोलने केली जात आहेत. कांद्याबरोबरच कापूस, सोयाबीन, हरभरा, द्राक्षाच्या पिकाला बाजारभावात उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकऱ्यांचे प्रंचड मोठे आर्थिक नुकसानी झाली आहे. कांदा पिक विक्रीनंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील शेतकऱ्यांला २ रुपयांचा धनादेश देण्यात आला असून ही शेतकऱ्यांची एक प्रकारे थट्टाच केली आहे. कांदा निर्यातीकरिता केंद्रसरकारने यापूर्वी लागू केलेली कांदा निर्यात प्रोत्साहन योजना सुरु करण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जात आहे. नाफेड तसेच मार्केटिंग फेडरेशनमार्फंतसुध्दा कांदा खरेदी सुरु करणे गरजेचे आहे, असेही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात सांगितले.
अंगणवाडी सेविका-मदतनीसांचे प्रश्न सोडवा: राज्यात दोन लाखांहून अधिक अंगणवाडी सेविका-मदतनीस कार्यरत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या न्याय मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाला बसल्या आहेत. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी यापूर्वी हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन केले होते. त्यामुळे अंगणवाडी सेविका- मदतीनीसांनी गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले आहे. कोरोना काळात चांगले काम केले आहे. अंगणवाडी सेविकांच्या मागण्या मान्य करुन त्यांचे प्रश्न तातडीने सोडविण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.
हेही वाचा: Maharashtra Budget Session 2023 : मराठी भाषिकांवरील अन्याय थांबवा, छगन भुजबळ यांची विधानसभेत मागणी