मुंबई - विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी आज महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली. यानंतर राजकीय चर्चांना मोठे उधाण आले होते, राज्यपाल नियुक्त आमदारकीसाठी प्रवीण दरेकर भेटण्यासाठी गेले होते, या भेटीवरून राज्यपाल नियुक्त आमदार निवडीवरून काहीतरी खलबतं, आणि राजकीय चर्चा देखील होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मात्र यावर दरेकर यांनी राज्यपाल भेटीत विधानपरिषद निवडणुकीची काही खलबतं नव्हती, ही केवळ सदिच्छा भेट होती असे स्पष्ट केले.
राज्यपालांचे काम नियमांच्या चौकटीत-
प्रवीण दरेकर राज्यापालांच्या भेटीनंतर म्हणाले की, दिवाळी व पाडव्याचा शुभेच्छा देण्यासाठी मी राज्यपालांना भेटायला आलो होतो. जे काय माध्यमावर चाललंय विधान परिषद निवडीबाबत काही खलबतं आहेत, मात्र तसे काहीही नाही. ही भेट फक्त शुभेच्छादेण्यासाठीची सदिच्छा भेट होती. तसेच राज्यपालांना जे नियम आहेत. त्या चौकटीतच ते काम करतील. राज्य सरकारला संयम नाही, त्यामुळे राज्यपाल नियुक्त आमदारकी कधी जाहीर करणार याचा कालावधी कळवा, अस ते म्हणत असल्याचा टोलाही त्यांनी यावेळी महाविकास आघाडीवर लगावला.
भाविकांची व आमची मागणी जोरात म्हणून मंदिर उघडावी लागली-
राज्य सरकारची नेमकी भूमिका काय ? मंदिर सुरू करण्याबाबत त्यांचा विचार काय ? भाविकांची मागणी जोरात होती.सर्व बाजूनी दबाव निर्माण झाला.मंदिरावर अवलंबून अनेकांचे व्यवसाय आहे.आता प्रचंड असंतोष होता त्यामुळे हा निर्णय घ्यावा लागला आणि दिवाळीत मंदिरं उघडावे लागले. आम्हाला श्रेय घ्यायची गरज नाही आणि मंदिर सुरू होण्यासाठी श्रेयवाद घेण्याची आवश्यकता नाही. राज्याच्या जनतेला माहितीये कोण यासाठी पाठिंबा देत होते, असे देखील प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे.
संजय राऊत यांची भूमिका दुतोंडी -
संजय राऊत यांनी भाजप नुसता श्रेय वादी आहे, अशी टीका केली होती. यावर दरेकर यांनी म्हटले की, संजय राऊत यांच्या भूमिका दुतोंडी असतात, कशाचं कोणी श्रेय घेतलं ते त्यांना माहितीच आहे, पहिले मंदिर फिर सरकार हे तुम्हीच म्हटले होते. मग अगोदर लालसेपोटी सत्तेत कसे आलात. तसेच सरकारने दुसरी लाट येणार सांगत, मंदिर उघडण्याचा निर्णय लांबवला, परंतु आमचा दबाव एवढा राहिला की अखेर मंदिर सुरू करण्याचा निर्णय घ्यावाच लागला.