मुंबई - गेल्या नऊ महिन्यांपासून अडून पडलेले शालेय शिक्षण विभागाचे पवित्र पोर्टल शनिवारपासून कार्यरत होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी या पोर्टलचे पुन्हा एकदा उद्घाटन झाले.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी 6 जूनला नागपुरात या पोर्टलची सुरूवात केली होती. त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. या माध्यमातून 10 हजार 1 जागा भरण्यासाठी कार्यवाही केली जाणार आहे. यादरम्यान लोकसभा निवडणुका येणार असल्याने ही कार्यवाही आचारसंहितेच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे.
शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मोठा गाजावाजा करून मागील वर्षी जूनमध्ये हे पोर्टल सुरू केले होते. मात्र, त्यातील अनेक अडचणीमुळे ते थांबविण्यात आले होते. आता लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यात सुधारणा करण्याचा दावा करत त्याचे उद्घाटन केले आहे.
राज्यातील सरकारी, अनुदानित, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये 32 हजारांहून अधिक शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचा कॅगचा अहवाल सांगतो. तर शालेय शिक्षण विभागाच्या 2013 च्या अहवालानुसार शिक्षकांच्या 28 हजार जागा रिक्त आहेत. याकडे दुर्लक्ष करत सरकारने त्यातून केवळ 10 हजार 1 जागा भरण्यासाठीचा मुहूर्त शोधला आहे. शनिवारी 2 मार्चला शिक्षकांच्या जागा भरण्यासाठीचे पोर्टल आणि त्यावरील जागांची जाहीरात पहावयास मिळणार आहे. मात्र, त्यापूर्वी शिक्षक भरतीची जाहिरात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पवित्र वेब पोर्टलवर प्रदर्शित करण्यात आली.

राज्यात या पोर्टलच्या माध्यमातून 10 हजार 1 शिक्षकांच्या जागा भरल्या जाणार असून, यापैकी अनुसूचित जाती- 1 हजार 704 , अनुसूचित जमाती- 2 हजार 147, अनुसूचित जमाती (पेसा)- 525, व्हि.जे.ए.- 407, एन.टि.बी.- 240, एन.टी.सी- 240, एन.टी.डी.- 199, इमाव- 1 हजार 712, इ.डब्ल्यू.एस.- 540, एस.बी.सी.- 209, एस.ई.बी.सी.- 1 हजार 154, सर्व साधारण- 924 या संवर्गातील जागांचा समावेश आहे.
राज्यात सुमारे 5 हजार च्या वर शिक्षक अतिरिक्त झाल्यामुळे समायोजनात रिक्त जागा कमी झाल्या आहेत. 6 जिल्ह्यातील बिंदू नामावलीनंतर शून्य जागा खुल्या, एसईबीसी आणि ईबीसी वर्गासाठी दिसल्यामुळे त्या सहा जिल्ह्यांच्या बिंदूनामावलीची फेरतपासणी केल्यानंतर या जागा त्वरित भरल्या जातील. तोपर्यंत 50 टक्के तिथल्या जागा भरल्या जातील असे तावडे यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या पोर्टलसाठी शिक्षण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा, शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी, उपसचिव चारुशिला चौधरी यांच्या कार्यगटाने परिश्रम करुन काम पूर्ण केले असल्याची माहिती तावडे यांनी दिली.