मुंबई - कोरोनामुळे देशात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये विद्यापीठाच्या परीक्षांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी परीक्षांबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. यामध्ये अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा होणार आहेत, तर प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.
विद्यापीठ अनुदान आयोगानुसार, अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा १ जुलै ते ३१ जुलै दरम्यान होणार आहेत. यामध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळून ही परीक्षा होणार आहे. प्रात्यक्षिक घेता आले नाहीतर, जे जर्नल सबमिट केले आहेत, त्यावरून प्रात्यक्षिकाचे गुणे दिले जातील.
प्रथम वर्षाच्या आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना परफॉर्मन्स बघून ग्रेडेशन दिले जाईल. त्यामध्ये चालू वर्षातील ५० आणि आधीच्या वर्षातील ५० टक्के ग्राह्य धरले जाईल. त्यानुसार त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश दिला जाईल. तसेच ज्यांना ग्रेडेशन कमी झाले असे वाटत असेल, तर अशा विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वर्षात परीक्षा देण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच जे विद्यार्थी या ग्रेडेशननुसार नापास होतील, त्यांना पुढील शैक्षणिक वर्षात प्रवेश मिळेल. मात्र, त्यांना पुढच्या वर्षई परीक्षा द्यावी लागणार आहे, असे सामंत म्हणाले.
मुंबई विद्यापीठ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा जवळपास झालेल्या आहेत. अशावेळी विद्यार्थ्यांना ग्रेडेशन आणि परीक्षा यापैकी ज्यामध्ये जास्त गुण असेल त्याचा विचार केला जाईल, असेही उदय सामंत यांनी सांगितले.