मुंबई - राज्यातील अकरावीच्या प्रवेशासाठी आयसीएसई विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेमध्ये ६ विषयांच्या गुणपत्रिकेवर एकूण ६ विषयांचे सरासरी गुण दर्शविण्यात आले आहेत. यापैकी पहिल्या ५ विषयांचे सरासरी गुण इयत्ता ११ वी प्रवेशाकरिता ग्राह्य धरण्यात येतील, असे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे. यासाठी आदेशही काढण्यात आल्याचे सांगण्यात आले.
आयसीएसईला ज्या विद्यार्थ्यांनी ६०० गुणांपैकी ६ विषय प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ग्रुप १ मधील ३ विषय, ग्रुप २ मधील २ विषय व ग्रुप ३ मधील १ विषय घेतलेले आहेत. गुणपत्रिकेमधील क्रमांक ६ मध्ये दर्शविण्यात आलेले विषय हे बहुतांशी ग्रुप ३ मधील आहेत. त्यामुळे पहिल्या ५ विषयांचे सरासरी गुण ग्राहय धरण्याबाबत कळविण्यात आले होते. ग्रुप ३ मधील विषय हा बेस्ट फाइव्हसाठी धरला जाऊ शकत नाही. या अनुषंगाने ६ विषय घेतलेल्या विद्यार्थ्यांचे ग्रुप १ मधील व ग्रुप २ मधीलच ५ विषयांचे गुण इयत्ता ११ वी प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत, असेही शिक्षण विभागाच्या आदेशात म्हटले आहे.
तथापि आयसीएसई मंडळातर्फे ७०० गुणांपैकी साम्य विषय घेऊन देखील परिक्षेस प्रविष्ट झाल्याचे निर्दशनास आले आहे. हे विद्यार्थी ग्रुप १ मधील ३ विषय व ग्रुप ३ मधील १ विषय प्रविष्ट झाले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश विचारात घेता या विद्यार्थ्यांना पुढीलप्रमाणे पर्याय उपलब्ध राहतील. ग्रुप १, २ मधील ६ विषयांपैकी कोणतेही ५ विषयांचे बेस्ट फाइव्ह गुण ग्राहय धरण्यात येतील किंवा (ब) ग्रुप १ , २ व ३ मधील ७ विषयांपैकी ७०० गुणांची सरासरी ग्राह्य धरण्यात येईल.
तरी या अनुषंगाने संबंधित आयसीएसई विद्यार्थ्यांना भाग १ व भाग २ मध्ये आवश्यक सुधारणा करण्याकरिता नजीकची शाळा अथवा मार्गदर्शन केंद्राशी संपर्क करण्याच्या आवश्यक सूचना सर्व आयसीएसई शाळांना देण्यात येत आहेत. त्यामुळे दि. २८ जून, २९ जून व १ जुलै २०१९ रोजी या विद्यार्थ्यांनी भाग १ व २ मध्ये आवश्यक सुधारणा करुन घ्याव्यात, असे शेलार यांनी निवेदनात म्हटले आहे.