मुंबई - कोरोना संक्रमण थांबविण्याच्या दृष्टीने लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर 24 तास उभे राहून कार्य करणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाचा विळखा बसला आहे. राज्यात तब्बल 1 हजार 273 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 131 पोलीस अधिकारी आणि 1 हजार 142 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, राज्यातील 11 पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे बळी गेला आहे.
राज्यातील विविध ठिकाणी उपचार घेत असलेले 291 पोलीस कोरोनातून बरे झाले असून यात 34 पोलीस अधिकारी व 257 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर, अजूनही 971 पोलिसांवर उपचार सुरू असून यामध्ये 96 पोलीस अधिकारी व 875 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
लॉकडाऊन काळात राज्यात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 10 हजार 140 गुन्हे नोंदविण्यात आले. यातील 676 जणांवर क्वारंटाईन मोडल्याच्या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. तर, पोलिसांवर हल्ला होण्याच्या 240 घटना घडल्या असून यात आत्तापर्यंत पोलिसांनी 819 जणांना अटक केली आहे. कोरोनाच्या संदर्भात पोलिसांच्या 100 क्रमांकाच्या नियंत्रण कक्षावर तब्बल 93 हजार 606 कॉल आले असून अवैद्य वाहतुकीच्या 1 हजार 317 प्रकरणात 59 हजार 363 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्स व मेडिकल स्टाफवर 38 ठिकाणी हल्ले झाले असून तब्बल 86 पोलीस कर्मचारी हे जखमी झाले आहेत.