मुंबई - राज्य पोलीस दलात मागील 24 तासात एकही कोरोनाग्रस्त पोलीस आढळून आला नसला तरी कोरोना संक्रमानामुळे मृत्यू पावलेल्या पोलिसांच्या संख्येत 1 ने भर पडली आहे. पालघर पोलीस विभागात कार्यरत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याचा मंगळवारी (दि. 9 जून) मृत्यू झाला आहे.
या मृत्यूनंतर आता कोरोनामुळे मृत पावलेल्या पोलिसांचा आकडा 35 वर गेला आहे. राज्यातील विविध रुग्णालयात अजूनही चौदाशे कोरोनाग्रस्त पोलिसांवर उपचार सुरू आहेत. यात 188 पोलीस अधिकारी तर 1 हजार 212 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
टाळेबंदीच्या काळात राज्यभरात कलम 188 नुसार तब्बल 1 लाख 24 हजार 369 गुन्हे नोंदविण्यात आले असून मुंबई वगळता क्वारंटाईनचा नियम मोडणाऱ्या 722 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. राज्यभरात टाळेबंदी काळात पोलिसांवर हल्ला होण्याच्या 263 घटना घडल्या असून या प्रकरणी आतापर्यंत 846 जणांना अटक करण्यात आली आहे. राज्यात वैद्यकीय पथकावर हल्ला होण्याच्या 47 घटना घडल्या असून 86 कर्मचारी हे जखमी झाले आहेत. कोव्हिड-19 च्या संदर्भात तब्बल 1 लाख 1 हजाराहून अधिक कॉल पोलीस नियंत्रण कक्षावर आले.
टाळेबंदीच्या काळात अवैध वाहतुकीच्या 1 हजार 332 प्रकरणात 23 हजार 986 जणांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंत 80 हजार 890 वाहने जप्त करण्यात आली असून तब्बल 6 कोटी 79 लाख 81 हजारांचा दंड पोलिसांनी थोटावला आहे.
हेही वाचा - सलून कामगारांसह व्यावसायिकांचे राज्यभर आंदोलन