मुंबई - नागरिकांना डेंग्यू आणि मलेरियाची लागण होऊ नये, यासाठी महापालिकेने डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट केली आहेत. गेल्या साडेसहा महिन्यात डेंग्यूचा प्रसार करणारी १८ हजार, तर मलेरियाचा प्रसार करणारी ३ हजार अशी एकूण २१ हजार डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्यात आली आहेत. दरम्यान मुलुंड येथील मॅरेथॉन गॅलॅक्सी या इमारतीमध्ये एका व्यक्तीचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला आहे. याच इमारतीमधील दोघांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.
महापालिकेद्वारे जानेवारी ते २० जुलै या साडेसहा महिन्यांच्या कालावधीत महापालिकेद्वारे ६८ लाख ८१ हजार ६८६ घरांची तपासणी केली. या तपासणी दरम्यान इमारती, सोसायटींच्या परिसरात १८ हजार ४२० ठिकाणी डेंग्यूच्या विषाणूंचा प्रसार करणाऱ्या 'एडिस एजिप्टाय' डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली आहेत, तर ३ हजार ७५२ ठिकाणी 'ऍनाफिलीस' या मलेरियाचा प्रसार करणाऱ्या डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली आहेत. डेंग्यूचा फैलाव करणाऱ्या 'एडिस एजिप्टाय' डासांची सर्वात जास्त भांडूप एस वॉर्ड येथे २ हजार ४३४, दादर माहीमी शिवाजी पार्क धारावी या विभागाच्या जी उत्तर विभागात ३ हजार ९७०, अंधेरी पूर्व येथील के पूर्व विभागात १ हजार ८९६ उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आली. तर मलेरियाचा पसार करणाऱ्या ऍनाफिलीस डासांची सीएसएमटी येथील ए विभागात २६८, भायखळा ई विभागात ३५२, तसेच पी उत्तर विभागात २६२ उत्पत्ती स्थळे नष्ट करण्यात आल्याची माहिती पालिकेने दिली आहे.
डेंग्यूची लागण झाल्याने एकाचा मृत्यू -
मुलुंड पश्चिमेला असणाऱ्या मॅरेथॉन गॅलॅक्सी या इमारतीत राहणाऱ्या एका ३२ वर्षीय व्यक्तीचा डेंग्यूची लागण होऊन मृत्यु झाला आहे, तर त्याच व्यक्तीच्या कुटुंबातील दोघांना डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याच सोसायटीच्या शेजारी असणाऱ्या 'ओयासिस' नावाच्या सोसायटीमध्येही दोन ठिकाणी डेंग्यू प्रसार करणाऱ्या 'एडिस एजिप्टाय' डासांची उत्पत्तीस्थळे आढळून आली. ही उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या पथकाने तत्काळ नष्ट केली आहेत. मुलुंड परिसरातील सदर सोसायटीमध्ये सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत महापालिकेच्या पथकाने पाहणी केली. या पाहणी दरम्यान सोसायटी परिसरात ४ ठिकाणी साचलेल्या पाण्यामध्ये डेंग्यूचा प्रसार करणारे एडिस एजिप्टाय डासांच्या अळ्या मोठ्ठ्या प्रमाणात आढळून आल्या. सदर उत्पत्तीस्थळे महापालिकेच्या पथकाने तत्काळ नष्ट केली.