मुंबई - गोवंडी परिसरातून बनावट टेलिफोन एक्स्चेंज चालवणाऱ्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. भारतीय लष्कराच्या गुप्त माहितीवरून शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. आरोपीकडून पोलिसांनी 223 सिमकार्डसह पाच सिमबॉक्स तसेच कॉल करण्यासाठी वापरण्यात येणारे टेलिफोन एक्स्चेंज साहित्य हस्तगत केले आहे.
संबंधित आरोपी जम्मू-काश्मीरमधील भारतीय लष्करा संदर्भातील हालचालींची गुप्त माहिती फोनवरून देत होता. परदेशातून येणारे व्हीआयपी कॉल्स अनधिकृतपणे 'सिम बॉक्स' कार्यप्रणालीद्वारे एअरटेल कंपनीच्या दोन भारतीय मोबाईल क्रमांकावर येत होते. यामध्ये देशातील वेगवेगळ्या ठिकाणांवर फोन येत होते.
गुन्हे शाखेच्या अधिकार्यांनी या संदर्भात दोन पथके स्थापन केली होती. या प्रकरणात आरोपी प्रीपेड कार्डचा वापर करत होते. हे दोन्ही मोबाईल क्रमांक मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्यातील आढळून आले. त्यानंतर या क्रमांकावर सर्वाधिक आऊटगोइंग कॉल तसेच इन्कमिंग एसएमएस असल्याचे आढळून आले होते. या दरम्यान गोवंडीतील शिवाजीनगर भागात नटवर पारेख कम्पाऊंडमध्ये संबंधितांचे एक्स्चेंज लोकेशन ट्रॅक झाले. पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी छापा मारला.यावेळी समीर कादर अलवारी या आरोपीला अटक केली असून त्याच्यावर यापूर्वी देखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्यासह अन्य पाच आरोपावर देखील अशा प्रकारचा गुन्हा दाखल आहे.
या आरोपीने आतापर्यंत आखाती देश व पाकिस्तानातून येणाऱ्या कॉल्सचे रूट भारतीय मोबाईल क्रमांकावर बदलले होते. याद्वारे देशविघातक कारवायांना खतपाणी घालण्यात येत होते. मात्र आता आणखी काहींना अटक करण्यात येणार आहे. त्यामुळे या प्रकारच्या हेरांचे रॅकेट सापडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पोलीस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत. या कारवाईत काही मोबाईल फोन, सिमकार्डसह लॅपटॉप, सर्व्हर यासारखे साहित्य जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
'सिम बॉक्स'चा प्रभावी वापर
सिम्बॉक्स ही समांतर टेलिफोन एक्स्चेंज चालवणारी कार्यप्रणाली आहे. यात इंटरनेटच्या माध्यमातून येणारे आंतरराष्ट्रीय कॉल्स डोमेस्टिक मोबाईल क्रमांकावर वळवण्यात येतात. ज्यामुळे आंतराष्ट्रीय मोबाईल क्रमांक न दिसता थेट स्थानिक भारतीय मोबाईल क्रमांक दिसतो. या क्रमांकावर येणाऱ्या कॉल्सवर नियंत्रण ठेवता येत नसल्याने त्याचा वापर देशविघातक कारवायांसाठी करण्यात येतो. यामुळे भारत सरकार व खासगी मोबाईल कंपन्यांचे देखील मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.