मुंबई - आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी समजल्या जाणाऱ्या धारावीत विक्रम साराभाई यांसारखे भौतिकशास्त्रज्ञ व खगोलशास्त्रज्ञ घडावे. साराभाई यांचे कार्य युवापिढीसमोर यावे या उद्देशाने स्वातंत्र्यदिनानिमित्त साराभाई यांचे कागदी मोझेक साकारण्यात आले. धारावी येथील काही संघटनांनी एकत्र येत कलाकार चेतन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली १० बाय १२ फुट आकाराची आणि ५,५०० काळ्या, पांढऱ्या, लाल, निळ्या, पिवळ्या, हिरव्या, केशरी या रंगांच्या कागदांचा वापर करत साराभाई यांची प्रतिकृती साकारली आहे. ही कलाकृती केवळ २६ तासात साकारण्यात आली आहे.
सन १९४५ साली दुसरे महायुद्ध संपल्यावर विक्रम साराभाई ब्रिटनला गेले. १९४७ साली त्यांनी ‘कॉस्मिक रे इन्वेस्टीगेशन इन ट्रॉपिकल लॅटीट्यूड’वर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली आणि त्याचवर्षी ते मायदेशी परत आले. भारतात त्यांनी ११ नोव्हेंबर १९४७ला अहमदाबाद येथे भौतिकी संशोधन कार्यशाळेची स्थापना केली. त्यानंतर अवकाश संशोधनात विक्रम साराभाई यांनी भरीव कामगिरी केली. साराभाई यांनी अहमदाबाद येथील भारतीय प्रबंध संस्था (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्ट) स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. १९७५ मध्ये पहिला अंतरिक्ष उपग्रह आर्यभट्ट अवकाशात सोडला गेला त्याची रचना विक्रम साराभाई यांच्या अहमदाबाद रिसर्च सेंटर मध्येच केली गेली होती.
नुकत्याच पार पडलेल्या चांद्रयान -2 ह्या मोहिमेत प्रमुखत: ऑर्बिटर, लँडर, आणि सहाचाकी रोव्हर अशा ३ प्रमुख भागातील लँडरला "विक्रम" हे नाव देण्यात आले आहे. हे नाव विक्रम साराभाई ह्यांच्या सन्मानार्थ देण्यात आले आहे. ज्यांनी भारताला अंतराळात एक नवा आयाम प्रस्थापित करून दिला, त्यांचे यावर्षी जन्मशताब्दी वर्षही आहे. त्यामुळे स्वातंत्र्यदिनी या महान शास्त्रज्ञाच्या स्मृती जागवण्यासाठी आणि कलेच्या माध्यमातून त्यांना मानवंदना देण्याचे आम्ही ठरवले, असे आर्टीस्ट चेतन राऊत यांनी सांगितले.
उज्ज्वल फ्युचर फाऊंडेशनच्या मुलांनी तसेच चेतन राऊत आणि संदीप बोबडे यांचे सहकारी, अशरफ खान, स्वप्निल खाडे, ईशा मुणगेकर, मेघना राणे, स्मिता ढोबळे, किरण सावंत, मिलिंद भुरवणे, ऋषीकेश माने, धर्मेश मोरे यांनी ही कलाकृती तयार केली आहे.