मुंबई : गेल्या आठवड्यात सीएसएमटी रेल्वे स्थानकात एका विद्यार्थिनीवर झालेल्या अतिप्रसंगानंतर पुन्हा रेल्वेच्या महिला सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केल्या जात आहेत. अशा प्रकारची एखादी घटना घडल्यानंतरच लोकलमध्ये सुरक्षा वाढवली जाते. मग नंतर जैसे थे परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे बऱ्याच महिला प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर उमटत असल्याचे दिसत आहे. अशा घटना घडू नयेत म्हणून महिला डब्यात पोलीस आणि आरपीएफच्या जवानांची वेळ वाढवण्याची मागणी करण्यात येत आहे. सध्या महिला डब्यात रात्री साडेआठपासून ते सकाळी सहापर्यंत जवान तैनात असतात. मात्र, सकाळी सीएसएमटी आणि चर्चगेट वरून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात पोलीस तैनात नसल्याने अशा घटनांना वाव मिळत आहे. त्यामुळे महिला लोकल डब्यात सकाळी नऊपर्यंत पोलीस तैनात करण्याची मागणी केली जात आहे.
रात्री उशिरा महिला लोकलमधून करतात प्रवास : गेल्या बऱ्याच वर्षांपासून महिला देखील उशिरा कार्यालयांमध्ये काम करतात त्याचप्रमाणे महिलांना नाईट ड्युटी देखील करावी लागते. त्यामुळे रात्री उशिरा लोकलमधून महिला प्रवास करतात. रात्रीच्या वेळी महिलांच्या डब्यात पोलीस कर्मचारी तैनात असतो. स्टेशनवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. रेल्वे प्रशासन महिला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विविध पावले उचलत आहे. असे असूनही रेल्वे प्रवासादरम्यान विनयभंग, बलात्कार आणि छेडछाड असे गुन्हे घडत असल्याने महिला सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे.
महिलांच्या विरोधातील गुन्हे रोखण्यात अपयश : रेल्वे पोलिसांनी साडेपाच महिन्यात 46 गुन्ह्यांपैकी 44 गुन्ह्यांचा तपास केला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वेकडून विविध उपाय केले जात असताना देखील रेल्वे प्रशासन किंवा लोहमार्ग पोलीस आणि रेल्वे सुरक्षा बलाकडून महिलांच्या बाबतीतील गुन्हे रोखण्यासाठी अपयशच येत आहे. लोकलमधून प्रवास करताना महिला प्रवाशांची छेडछाड विनयभंग तसेच बलात्काराच्या घटनांना महिलांना सामोरे जावे लागत आहे.
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे : मुंबईतील मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे या तिन्ही मार्गांवरून दर दिवशी 75 ते 60 लाखांपर्यंत प्रवाशी प्रवास करतात. यात महिलांची संख्या 20 टक्के आहे. महिलांच्या डब्यात रात्री नऊ ते सकाळी सहा वाजेपर्यंत पोलीस असतात. ही व्यवस्था अपुरी पडू लागल्याने मध्या पश्चिम रेल्वेकडून महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र तरी देखील महिलांच्या सुरक्षेचे तीन तेरा वाजलेले आहेत.
लोकलमध्ये बलात्काराच्या घडल्या इतक्या घटना : जानेवारी महिन्यात छेडछाडीच्या सात घटना रेल्वेमध्ये घडल्या तर एक विनयभंगाची घटना घडली. फेब्रुवारी महिन्यात लोकलमध्ये एक बलात्काराची घटना, आठ छेडछाडीचे गुन्हे तर एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळत आहे. त्याचप्रमाणे मार्च महिन्यात एक बलात्काराचा गुन्हा, 12 छेडछाड आणि एक विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. तसेच एप्रिलमध्ये सात छेडछाड झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तर मे महिन्यात चार छेडछाडीच्या घटना घडल्या. रेल्वे पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास केल्याची आकडेवारी दाखवण्यात येते. मात्र कित्येक गुन्ह्यांमध्ये समान आरोपी असतात. या आरोपींवर कायद्याचा वाचक असायला हवा अशी प्रतिक्रिया रेल्वे यात्री परिषदेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी ईटीव्ही भारतला दिली आहे.
हेही वाचा -