मुंबई - आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक चिकित्सा (ऑक्युपेशनल थेरपी) पद्धतीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुर्दैवाने आपल्याकडील सामाजिक आणि आर्थिक निरक्षरतेमुळे या चिकित्सा पद्धतीला तितकासा वाव मिळत नाही. परिणामी व्यावसायिक चिकित्सकांना नाईलाजाने परदेशाची वाट धरावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने याप्रकरणी लक्ष घालून वैद्यकीय आस्थापना कायद्यात बदल करण्याबरोबरच राष्ट्रीय आरोग्य मिशन, ग्रामीण आरोग्य कार्यक्रम यांसारख्या महत्त्वाच्या आणि दूरगामी सरकारी उपक्रमांमध्ये व्यावसायिक चिकित्सा पद्धतीचा समावेश करावा, अशी मागणी अखिल भारतीय व्यावसायिक चिकित्सक संघटनेतर्फे वॉकेथॉन करण्यात आली.
आरोग्य क्षेत्रात व्यावसायिक चिकित्सा पद्धतीचे (ऑक्युपेशनल थेरपी) महत्त्व अधोरेखित करण्यासाठी तसेच दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्याआपल्या मागण्यांकडे लक्ष वेधून घेण्यासाठी अखिल भारतीय व्यावसायिक चिकित्सक संघटनेतर्फे (एआयओटीए) रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संघटनेने आपल्या विविध मागण्यांची यादी सादर केली.
यावेळी बोलताना संघटनेचे अध्यक्ष अनिल के. श्रीवास्तव म्हणाले, की ‘’व्यावसायिक चिकित्सा पद्धतीविषयी पुरेशी जागरूकता समाजात नाही. त्यातच आपल्याकडील सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती बेतास बात असल्याने व्यावसायिक चिकित्सा पद्धतीची ग्राहकसंख्याही खूप कमी आहे. याची दखल घेऊन केंद्रीय व्यावसायिक चिकित्सा पद्धती परिषदेची स्थापना केली जावी, अपंगांना तसेच शारीरिक व्याधींनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना योग्य उपचार मिळावे, या उद्देशाने व्यावसायिक चिकित्सा पद्धती क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी प्रमाणित अशा नियमांची आखणी केली जावी आणि शैक्षणिक धोरण राबवले जावे. तसेच कोणत्याही पदवीविना या क्षेत्रात घुसखोरी करू पाहणाऱ्यांना चाप बसेल, अशा कठोर धोरणांची अंमलबजावणी सरकारने करावी. श्रीवास्तव पुढे म्हणाले, की देशात सद्यःस्थितीत ४० ते ४५ हजार व्यावसायिक चिकित्सक (ऑक्युपेशनल थेरपिस्ट) आहेत. परंतू व्यवसायसंधींच्या अभावी यातील २५ ते ३० टक्के व्यावसायिक परदेशात स्थलांतरित होत आहेत. ही परिस्थिती बदलणे आवश्यक असून त्यासाठी व्यावसायिक चिकित्सा पद्धतीचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांचे शुल्क कमी केले जावे, सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमांचा समावेश केला जावा, अशी आमची मागणी आहे. या मागण्यांचा आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत. यासाठी जनजागृती करण्यासाठी आम्ही आज वॉकेथॉनचे आयोजन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
अखिल भारतीय व्यावसायिक चिकित्सक संघटनेतर्फे केईएम रुग्णालय आणि जीएस वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी आज आयोजित करण्यात आलेल्या वॉकेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई या परिसरातील ५०० हून अधिक व्यावसायिक चिकित्सकांनी वॉकेथॉनमध्ये सहभाग नोंदवला.
२७ ऑक्टोबरपासून अखिल भारतीय व्यावसायिक चिकित्सक संघटनेतर्फे देशभरात व्यावसायिक चिकित्सेसंदर्भात जनजागृती मोहीम राबविली जात आहे. लोकांना व्यावसायिक चिकित्सा पद्धतीविषयी जागरुक करणे, अधिकाधिक विद्यार्थी/तरुणांना या व्यवसायाकडे आकृष्ट करणे, या चिकित्सा पद्धतीचे आरोग्य क्षेत्रात काय योगदान आहे याची जास्तीत जास्त माहिती लोकांपर्यंत पोहोचवणे, कोणत्याही वयोगटातील रुग्णांसाठी ही चिकित्सा पद्धती कशी योग्य आहे, याचे महत्त्व पटवून देणे, हे या वॉकेथॉन जनजागृती मोहिमेचे उदिद्ष्ट आहे.