मुंबई - संक्रांतीला मोठ्या प्रमाणात पतंग उडवले जातात. मात्र त्यासाठी नायलॉन मांजाचा वापर केला जातो. हा मांजा पक्षांबरोबर माणसांच्याही जीवाला धोका निर्माण करत आहे. आत्तापर्यंत या मांजामुळे दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. पक्षांनाही जीव गमवावा लागला आहे. एकट्या नाशिक शहरात ६६ पक्षांचे जीव गेले आहेत तर तब्बल ३०० पेक्षा अधिक पक्षी जखमी झाले आहेत.
नाशिकमध्ये पहिला बळी
नायलॉन मांजावर बंदी असतानाही तो सर्रास विकला जात आहे. त्याचा जबरदस्त फटका बसतोय. नाशिकमध्ये दुचाकीवरुन घरी परतत असताना नायलाॅन मांजाने गळा चिरुन महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना द्वारका उड्डाणपूल येथे घडली आहे. २७ डिसेंबरला ही घटना घडली. त्यात भारती जाधव वय (४६) या महिलेचा मृत्यू झाला. शहरात मांजामुळे पक्षांचाही जीव जात असल्याचेही समोर आले आहे. गेल्या दोन वर्षात नायलॉन मांजामुळे 66 पक्षांचा मृत्यू झाला असून 300 पेक्षा अधिक पक्षी जखमी झाले आहेत.
नागपुरात तरूणाचा बळी
नागपूरच्या इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामबाग परिसरात एका दुचाकी चालकाचा नायलॉन मांजाने गळा कापला गेल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रणय ठाकरे असे या २० वर्षीय तरुणाचे नाव आहे. प्रणय दुचाकी मोपेडने जात असताना रस्त्यावर नायलॉन मांज्याचा दोरा आडवा आला. हा दोरा त्याच्या गळ्याभोवती आवळला गेल्यामुळे प्रणयचा गळा अर्ध्यापेक्षा जास्त कापला गेला. ज्यामुळे प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. १२ जानेवारीला ही घटना घडली.
थोडक्यात वाचला होता आदित्य
३० डिसेंबरला नागपुरात बंदी असलेल्या नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्यामुळे १७ वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. आदित्य मानकापूर परिसरातील गोधनी मार्गावरून बाईकने कॉम्प्युटर क्लासला जात होता. तेव्हा त्याच्या बाइकसमोर अचानक हवेतून नायलॉन मांज्याचा दोरा आडवा आला. त्यामुळे आदित्यचा गळा कापला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत आदित्य दुचाकीवरून खाली कोसळला आणि बरेच लांब फरफटत गेला. आजूबाजूच्या लोकांनी त्याला उपचारांसाठी जवळील खासगी रुग्णालयामध्ये नेले. तेथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्याची स्थिती जास्त गंभीर असल्याने त्याला अन्य एका खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. वेळेत उपचार मिळाल्यामुळे आदित्यचा जीव थोडक्यात वाचला होता.
पक्षांनाही बसतोय फटका
संक्रातीला बच्चे कंपनीला पंतग उडविण्याचे वेध लागतात. मात्र, पतंग उडविण्याचा हाच आनंद पक्ष्यांच्या जीवावर अनेकदा बेतल्याचे समोर आले आहे. अश्याच दोन्ही प्रसंगात घुबडासह व्हाइट ब्रेस्टेड किंगफिशर (खंड्या) पक्षांच्या पंखात नायलॉनचा मांजा अडकून ते जखमी झाल्याची घटना घडली आहे. दोन्ही घटना कल्याण पश्चिमेला असलेल्या आधारवाडी व ठाणकरपाडा परिसरात असलेल्या सोसायटीमध्ये घडल्या आहेत.
कारवाईचा बडगा
नागपूरच्या पाचपावली पोलिसांना सूचना मिळाली होती, की बांगलादेश परिसरातील अनेक दुकानांमध्ये नायलॉन आणि चायनीज मांज्याची विक्री सुरू आहे. या माहितीच्या आधारे पाचपावली पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली असताना काही दुकानांमध्ये मांजा आढळून आल्यानंतर पोलिसांनी संपूर्ण मांजा आणि पतंग जप्त केले होते. या शिवाय प्लास्टिक पतंगावरही कारवाई करण्यात आली आहे. लास्टिक पतंग आणि नायलॉन मांजा वापराच्या बंदीबाबत एकीकडे जनजागृती होत असतानाच बाजारात काही व्यापारी त्याची विक्री करीत आहे. मनपा आयुक्तानच्या आदेशानुसार, अशा व्यापाऱ्यांवर मनपातर्फे कारवाई सुरू करण्यात आली आहे. धंतोली झोनअंतर्गत एक, गांधीबाग झोनअंतर्गत सहा, सतरंजीपुरा झोनअंतर्गत एक आणि आशीनगर झोनअंतर्गत एक कारवाई करण्यात आल्या. या माध्यमातून नऊ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. १६४ नग प्लास्टिक पतंग जप्तीची कारवाईही करण्यात आली.
जळगाव
शहरातील बागवान मोहल्ल्यातील मोची गल्ली (पतंग गल्ली) परिसरात बेकायदेशीर नायलॉन मांजाच्या मोठ्या साठ्यावर शनीपेठ पोलीसांनी छापा टाकला. यात ४० ते ५० हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच गोडावून मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदूरबार
जिल्ह्यातून 55 हजारांचा नायलॉन मांजा जप्त
मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने नायलॉन मांजा विक्रीवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. एकाच दिवशी जिल्हाभरात नायलॉन मांजा विकणार्या 15 विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 55 हजाराचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नायलॉन मांजा विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली. नंदुरबार शहरासह जिल्ह्यात पतंगोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा होतो. त्यामुळे महिनाभर अगोदरच पतंग व मांजा विक्रीला सुरूवात होते.
नाशिक
शहरातील भद्रकाली, पंचवटी भागात गुन्हे शाखेने कारवाई करत हजारो रुपयांचा मांजा जप्त केला होता. भद्रकाली आणि पंचवटी भागातील कारवाईत 78 गट्टे मांजाचे नग जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी आरोपी प्रशांत दिंडे आणि दानिश इसाक अत्तार या दोन विक्रेत्यांना अटक करण्यात आली. गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंद वाघ, महेश कुलकर्णी यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. नाशिकमध्ये एका महिलेचा मांजामुळे मृत्यू झाला होता.
नायलॉन मांज्यावर बंदी -
मकरसंक्रातीच्या सणाला पतंग उडवून आनंदोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. परंतु, आता अनेक जणांकडून पतंग उडवताना खास करुन नायलॉन मांजा वापरला जातो. हा मांजा पक्षी तसेच मानवी जीवितास घातक असतो. म्हणून त्याच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असताना बाजारात हा मांजा विक्री होतो. या संदर्भात औरंगाबाद खंडपीठाने गतवर्षी सुमोटो याचिका (रिट पिटीशन क्रमांक ९०७, ८/२०२०) दाखल केली होती. त्यानुसार नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे.