मुंबई - कोरोना व टाळेबंदीच्या काळात पायाभूत सुविधा प्रकल्पात काम करणारे स्थलांतरित मजूर आपापल्या गावी परत गेले. त्यामुळे पायाभूत सुविधा प्रकल्प ठप्प झाले. पण, आता मात्र परिस्थिती बदलू लागली आहे, असे म्हणत आता मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) सर्व प्रकल्पांनी वेग घेतल्याची माहिती महानगर आयुक्त आर.ए. राजीव यांनी दिली आहे. तर प्रकल्पाचे काम एक-दीड महिने बंद होते. त्यामुळे प्रकल्पास कुठेही मोठा विलंब होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
मेट्रो 2 अ, ब, मेट्रो 7, मेट्रो 6, मेट्रो 4 यासह शिवडी-नावा-शेवा सागरी मार्ग (एमटीएचएल), असे मोठे आणि महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू आहेत. महत्वाचे म्हणजे या प्रकल्पावर स्थलांतरीत मजूर मोठ्या संख्येने काम करतात. बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड, आसाम येथील मजूरांचा यात सर्वाधिक समावेश आहे. कोरोनाचा कहर सुरू झाल्यानंतर लॉकडाऊनमध्ये काम बंद झाल्यानंतर मात्र हे मजूर भीतीने-चिंतेने आपापल्या गावी गेले होते. परिणामी मे महिन्याच्या शेवटी पायाभूत सुविधा प्रकल्पाचे काम सुरू करण्यास परवानगी मिळाली तेव्हा एमएमआरडीएकडे मजूरच नसल्याचे चित्र होते. त्यामुळेच कधी नव्हे ते कंत्राटदाराला मजूर मिळवून देण्यासाठी चक्क एमएमआरडीएला जाहिरात प्रसिध्द करावी लागली.
या जाहिरातीनंतर आणि अनलॉकचा एक-एक टप्पा जसा पुढे जाऊ लागला. तसे मजूर पुन्हा मुंबईत परतू लागले. आता तर मजूरांची कोणत्याही प्रकल्पात कमतरता नाही. मेट्रोच्या सर्व प्रकल्पात आवश्यक तेवढे मजूर आहेत. तर एमटीएचएल प्रकल्पात तर आजच्या घडीला 95 टक्के मजूर काम करत आहेत, अशी माहिती राजीव यांनी दिली आहे. एकूणच आता परिस्थिती सुधारल्याने प्रकल्प वेग घेतील आणि लवकरात लवकर पूर्ण होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
हेही वाचा - कंगना रणौत आरपीआयमध्ये आल्यास स्वागत- रामदास आठवले