मुंबई - लोकप्रतिनिधीं हे लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिलेले असतात. मात्र मुंबईत प्रत्येक नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले आहे. त्या केंद्रांवर स्थानिक नगरसेवक आणि लोकप्रतिनिधी आपली जाहिरात करण्यासाठी बॅनरबाजी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. अशा बॅनरविरोधात कारवाई करण्याचे आदेश पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले आहेत.
होर्डिंग बॅनर्स हे हटवा
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरू आहे. पालिका, सरकारी आणि खासगी केंद्रांवर लसीकरण केले जात आहे. पालिकेची लसीकरण केंद्र लांब असल्याने नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी 227 नगरसेवकांच्या वॉर्डात प्रत्येकी एक लसीकरण केंद्र सुरू करण्याची परवानगी पालिका आयुक्तांनी दिली. त्यानुसार बहुसंख्य लसीकरण केंद्र सुरू झाली. मात्र या लसीकरण केंद्राबाहेर आणि आत लोकप्रतिनिधी नगरसेवक आपले बॅनर लावू लागले आहेत. यापुढे अशा लोकप्रतिनिधींना जाहिराती लावण्यास लेखी मनाई आदेश देण्यात आले. तरीही जाहिरातबाजी सुरू राहिल्यास संबंधित होर्डिंग, बॅनर्स हे हटविण्याची कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी सर्व अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त व उपायुक्त यांना दिले आहेत.
होर्डिंग, बॅनर्स लावू नयेत
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला. राज्य सरकार व पालिका आरोग्य यंत्रणा यांनी अथक प्रयत्नांनी विविध उपाययोजना करून जानेवारी २०२१ मध्ये कोरोनावर नियंत्रण आणले. परंतू फेब्रुवारी २०२१ च्या मध्यापासून मुंबईत काही बेफिकीर नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला व दुसरी लाट आली. ही लाट रोखण्यासाठी पालिकेने 227 नगरसेवकांच्या वॉर्डमध्ये लसीकरण केंद्र सुरू केले आहे. या केंद्रांवर लोकप्रतिनिधीनी राजकीय पक्षाच्या जाहिराती होर्डिंग लावण्यास सुरुवात केली. त्यामुळे लसीकरण केंद्रांवर होर्डिंग, बॅनर्स लावू नयेत अशी तंबी दिली आहे. तसेच याप्रकरणी अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक आयुक्त, उपायुक्त यांनी संबंधित लोकप्रतिनिधी यांना लेखी विंनती करावी, असे आदेश दिले आहेत. तरीही त्याबाबत लोकप्रतिनिधीनी नियमांचे उल्लंघन केल्यास आणि तसे होर्डिंग, बॅनर्स लावल्यास ते काढून टाकण्यासाठी कारवाई करण्यात यावी, असे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.
हेही वाचा- पॉझिटिव्ह रुग्णसंख्येवर ठरणार मुंबई लोकलचा निर्णय - विजय वडेट्टीवार