मुंबई : अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे ( All India Council of Technical Education ) मुंबईतील पवई येथे असलेले विभागीय कार्यालय आता दिल्लीला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती या विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे. तंत्रशिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी संसदेच्या निर्देशानुसार प्रत्येक राज्यात आणि प्रमुख शहरांमध्ये तंत्रशिक्षण परिषदेचे विभागीय कार्यालय स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मुंबईत चर्चगेट येथे 1987 रोजी मध्ये या कार्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर हे कार्यालय पवई येथे स्थलांतरित करण्यात आले. मात्र आता यूजीसीच्या नव्या अध्यक्षांकडे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचा ही अधिभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई येथील हे कार्यालय आता दिल्लीला स्थलांतरित करण्याचा निर्णय या नव्या अध्यक्षांनी घेतला असून हे कार्यालय पंधरा दिवसात तडकाफडकी स्थलांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तंत्रशिक्षणाच्या विकेंद्रीकरणावर परिणाम : या निर्णयामुळे राज्यातील तंत्र शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांना आता विविध परवानग्यांसाठी दिल्ली कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्र असेल गुणवत्ता पत्रके असतील या सर्वांसाठी दिल्ली कार्यालयाशी संपर्क साधावा लागणार आहे. प्रत्यक्षात ही बाब अत्यंत कठीण असून सुद्धा अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आल्याबाबत विभागीय कार्यालयात असलेल्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईतील महत्त्वाची कार्यालय मुंबई बाहेर नेण्याचा केंद्र सरकारचा सपाटा सुरू असताना त्यामध्येच आणखी एका कार्यालयाची भर पडल्याची चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.
कर्मचाऱ्यांची कुटुंबे चिंताग्रस्त : दरम्यान या कार्यालयाची संबंधित असलेल्या कायमस्वरूपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांचे दावे दणाणले आहे अचानक आलेल्या या निर्णयामुळे आता कुटुंबासहित दिल्लीला स्थलांतर करावे लागणार असल्याने या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांवर स्थलांतराची कुऱ्हाड कोसळली आहे यातील अनेक कर्मचाऱ्यांचा पगार अत्यंत तुटपुंजा असल्याने त्यांना दिल्ली येथे जाऊन आपले कुटुंब चालवणे कठीण होणार आहे त्यामुळे नेमके काय करायचे असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला असल्याचेही त्यांनी सांगितले.