मुंबई - बिल्डर आणि एका खाजगी ट्रस्टच्या मालकी हक्काच्या वादात चांदीवलीच्या रहेजा विहारमधील घरमालकांना आपल्या घराचे कोणतेही कायदेशीर व्यवहार करण्यास बंदीची नोटीस आली. या नोटीसीविरोधात स्थानिक रहिवाश्यांनी आज विकासकांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केले.
पवई, चांदिवलीच्या मागील दशकात झालेल्या विकासात चांदिवली भागात नहार अम्रित शक्ती, रहेजा विहार, म्हाडा वसाहत, लेक होम, लोकमिलन अशा अनेक कॉम्प्लेक्सची निर्मिती येथे करण्यात आली आहे. यातील एक महत्वाचे म्हणजे ‘के रहेजा गृप’ यांच्या माध्यमातून बनवण्यात आलेले रहेजा विहार. जवळपास २० सोसायटीत २ हजार ५०० ते ३ हजार परिवाराचे आज येथे वास्तव्य आहे. पवई तलाव आणि चांदिवलीचे ऐतिहासिक चांदिवली स्टुडीओ यांच्या मधोमध वसलेल्या या वस्तीला वाहतूक कोंडी, किलबिलाट अशा सर्वांपासून दूर असल्याने शांतीचे ठिकाण म्हणून सुद्धा ओळखले जाते.
सुरुवातीच्या काळात बिबट्याच्या वावरामुळे आणि मुलावर झालेल्या हल्ल्यानंतर काही काळ शांतता भंग झाली होती. त्यानंतर काही दिवसातच या परिसरात ही शांती परतली होती. रहेजाकरांनी सुटकेचा निश्वास सोडलाच असेल की आता एक नवीन संकट त्यांच्या डोक्यावर तरंगत आहे. एका खाजगी संस्था आणि विकासक या दोघांच्यात येथील जमिनीच्या मालकी हक्काला घेवून वाद चालू आहे. या वादात रहिवाशांना नोटीसी पाठवून येथे कुठलेही व्यवहार करण्यास बंदी आणली आहे.
विकासकाच्या प्रतिष्ठेला पाहून जवळपास २० रहिवासी सोसायटीतील लोकांनी दशकापूर्वी येथे आपली स्वप्नातील घरे खरेदी केली आहेत. मात्र, आता या इमारती उभी असणाऱ्या जमिनीच्या मालकी हक्कावरून वाद सुरु असून टायटल क्लीअर नसल्याचे सांगितले जात आहे. प्रॉपर्टी कार्ड तिसऱ्याच व्यक्तीच्या नावे असून त्याने न्यायालयात धाव घेत आमच्याकडे त्याच्या मर्जीची मागणी केली आहे. विकासकाने आमच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन करतानाच आमचा विश्वासघात करून फसवणूक केली आहे, असे याबाबत बोलताना गौतम सैगल यांनी सांगितले.
जमिनीच्या वादावरून न्यायालयात वाद सुरु असतानासुद्धा विकासक येथील मोकळ्या जमिनीवर नवीन इमारती बनवण्याचे काम जोमात करत आहे. आमची समस्या अजून मिटली नसताना नवीन इमारतीत आणखी लोकांची अडवणूक होवू नये, यासाठी रविवारी (३० जूनला) आम्ही हे बांधकाम सुरु असणाऱ्या जागेत एकत्रित येवून विकासक यांना जाब विचारण आहोत. त्यासोबतच पुढील वाटचालीवर चर्चा करणार आहोत, असे जयप्रकाश शेट्टी यांनी सांगितले.
रहेजा विहारमधील २४ इमारतीची जागा ही मोहमद युसूफ ट्रस्टची आहे, असे युसूफ ट्रस्ट म्हणते. तर रहेजा विहारमधील ज्या लोकांनी घर खरेदी केले आहेत. त्यांना रहेजा विकासक व युसूफ ट्रस्ट यांच्यात पुढे काय होणार माहीत नाही. या दोघांच्या वादात आम्ही रहिवाशी पडत नाही. या दोघांनी एकत्र येत मालकी हक्क कोणाचा हा वाद मिटवून आम्हा रहिवाश्यांना न्याय द्यावा. यासाठी आम्ही आज रहेजा विकासकांच्या कार्यालयासमोर हे निर्देशने करत आहोत, असे यावेळी रहेजा इमारतीतील रहिवासी शरद पवार यांनी सांगितले.