मुंबई : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे, अनेक रुग्णालये-नर्सिंग होमचे कोविड सेंटरमध्ये रुपांतर झाल्याने एप्रिल-मे-जून मध्ये नॉन-कोविड रुग्णांचे मोठे हाल झाले. त्यातही शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपणावर मोठा परिणाम झाला होता. पण, आता मात्र अनलॉकमध्ये नॉन-कोविड रुग्णांना दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. त्यातही शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियाचे प्रमाणही आता हळूहळू वाढण्यास सुरुवात झाल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत. लॉकडाऊनमध्ये जिथे 10 ते 15 टक्के काम सुरू होते तिथे आता 50 टक्के काम सुरू झाल्याचेही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
मार्चअखेरीस मुंबईत कोरोनाचा कहर सुरू झाला आणि मुंबई लॉकडाऊन झाली. मुंबईतील सर्वच पालिका-सरकारी रुग्णालयाबरोबर अनेक खासगी रुग्णालयेही कोविड रुग्णालयात रुपांतरीत झाली. खासगी नर्सिंग होम्स-क्लिनिकचे शटरही डॉक्टरांनी कोरोनाच्या भीतीमुळे बंद केले. त्यामुळे अगदी छोट्या-मोठ्या आजारासाठीही मोठ्या रुग्णालयात धाव घ्यावी लागत होती. तर तिथे कोरोना रुग्ण असल्याने कोरोनाच्या संसर्गाची भीती असल्यामुळे अनेक रुग्ण रुग्णालयात जाणे टाळत होते. त्यामुळे आजार बळावत होता. पण अशावेळी ज्या रुग्णांवर तत्काळ उपचार करण्याची गरज आहे अशा रुग्णांनाच प्राधान्य देत डॉक्टरांनी उपचार, शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू ठेवल्या. पण हे प्रमाण खूपच कमी होते. कर्करोग आणि क्षयरोग आजारासाठी मुंबईत स्वतंत्र रुग्णालये असल्याने त्यांना तितकासा त्रास सहन करावा लागला नाही. मात्र, कोविड चाचणी करत तपासणी करावी लागत होती.
आता, मात्र जूनपासून परिस्थिती सुधारू लागली आहे. जुलैमध्ये तर अनेक पालिका-सरकारी रुग्णालयासह खासगी रुग्णालये नॉन-कोविड रुग्णांसाठी खुले करण्यात आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत. त्यातही आता कोरोनाची भीती काही कमी होत असल्याने रुग्णही रुग्णालयात येण्याचे प्रमाण वाढण्यास सुरुवात झाली आहे. तर आता शस्त्रक्रिया आणि अवयव प्रत्यारोपणही सुरू झाले आहे. त्यानुसार लिव्हर प्रत्यारोपणाचा विचार करता मुंबईत महिन्याला 25 ते 30 लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत होत्या. पण लॉकडाऊनमध्ये, एप्रिल-मे मध्ये मुंबईत लिव्हर प्रत्यारोपणाची एकही शस्त्रक्रिया झाली नाही, अशी माहिती सब कमिटी झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी (लिव्हर ट्रान्सप्लांट) चे अध्यक्ष डॉ. रवी मोहंका यांनी दिली आहे. मेअखेरीस मात्र आम्ही इमर्जन्सी रुग्णांवर उपचार आणि शस्त्रक्रिया करण्यास सुरूवात केली. तर, जूनमध्ये परिस्थिती आणखी सुधारली आणि मग आम्ही सेमी इमर्जन्सी रुग्णांना दाखल करून घेत अवयव प्रत्यारोपण सुरू केले. त्यामुळे आता जुलै महिन्यात 10 ते 12 लिव्हर प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया झाल्या आहेत. एकूण आता 50 टक्के काम सुरू झाले असून आता रुग्णही येऊ लागले आहेत. त्यांची आधी कोविड चाचणी करत त्यांना उपचार देत प्रत्यारोपण करत आहोत. पुढे ही परिस्थिती आणखी सुधारून 100 टक्के प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू होतील, असा विश्वास डॉ. मोहंका यांनी व्यक्त केला आहे.
मुंबईत महिन्याला 40 ते 50 किडनी प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया होत होत्या. पण एप्रिल-मे मध्ये कोरोनाच्या भीतीने किडनी दाते पुढे येत नव्हते. आताही त्यांच्या मनात कोरोनाची भीती आहे. त्यामुळे आम्ही प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सुरू केल्या असतानाही दाते पुढे येत नसल्याने रुग्णांना डायलिसिसवरच ठेवावे लागत असल्याची माहिती प्रशांत राजपूत, किडनी प्रत्यारोपण शल्यचिकित्सक, ग्लोबल हॉस्पिटल यांनी दिली आहे. आता जुलैमध्ये काही प्रमाणात दाते पुढे येऊ लागले आहेत. त्यामुळे एप्रिलमध्ये इमर्जन्सी 5 तर मेमध्ये 10 प्रत्यारोपण झाले होते. तिथे जुलैमध्ये 15 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया झाल्या आहेत, असेही डॉ. राजपूत यांनी सांगितले आहे.
तर, हृदय प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रियामध्येही आता वाढ होण्यास सुरुवात होईल अशी माहिती ठाण्याच्या फोर्टिस रुग्णालयातील ज्येष्ठ हृदय प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ. अन्वय मुळे यांनी दिली आहे. हृदय प्रत्यारोपण हे फक्त ब्रेन डेड डोनरच्या माध्यमातूनच होते. त्यामुळे मुंबईत 2 वा 3 शस्त्रक्रिया होतात. पण मधल्या काळात कोरोनाच्या भीतीने ब्रेन डेड रुग्णांचे नातेवाईक पुढे आलेच नाहीत. त्यामुळे प्रत्यारोपण झाले नाही. पण आता भीती कमी होऊ लागल्याने रुग्ण उपचारासाठी पुढे येत आहेत. तर प्रत्यारोपणही 1-2 या महिन्यात झाले आहेत, असेही डॉ. मुळे म्हणाले. तर, येत्या काही महिन्यात चित्र पुन्हा बदलेल आधीप्रमाणे शस्त्रक्रिया सुरू होतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान आता कर्करोग, क्षयरोग, हाडांचे आजार आणि अन्य आजारावरही उपचार सुरू झाले आहेत. नायर असो वा सायन रुग्णालय आता तिथे नॉन कोविड रुग्णांना बेड उपलब्ध होत असून त्यांच्यावर उपचारही केले जात आहेत.