मुंबई - शहरात दररोज कोरोनाबधितांचा आकडा वाढत आहे. प्रशासन सतत सूचना करूनही अद्याप लोकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे चित्र दिसत आहे. असाच एक प्रकार मुंबईच्या अंधेरी पूर्व येथील साकीनाका विहार रोड परिसरात असलेल्या उदय नगर रहिवाशी सोसायटी बाहेरील भाजी मार्केटमध्ये समोर आला आहे. या मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सचे तीन-तेरा वाजलेले दिसत आहेत.
आज रविवार असल्याने या भाजी मार्केटमध्येच असलेल्या मच्छी मार्केटमध्ये नागरिकांनी सकाळपासून गर्दी केल्याचे दिसून आले. एकीकडे प्रशासनाने अनेक ठिकाणी वसलेले भाजी मार्केट या लॉकडाऊन काळात मोकळ्या मैदानात स्थलांतरित केले आहे. दुसरीकडे परिसरातील लोकांना काहीच गांभिर्य नसल्याचे या व्हिडिओतून दिसून येते. ही गर्दी पाहता येथील स्थानिक जागरूक नागरिकांनी पालिका प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे.
देशात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई हे सर्वाधिक बाधित रुग्ण असलेले शहर आहे. नागरिकांनी राज्य सरकार आणि पोलिसांच्या सुचनांचे पालन करून घरातच राहणे गरजेचे आहे.