मुंबई- देशाचे दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक स्वर्गीय यशवंतराव चव्हाण आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकांच्या धर्तीवर शहरात उभारण्यात येईल, असे वित्त व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अतिरिक्त अर्थसंकल्पात घोषित केले होते. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी कोणताही भूखंड आत्तापर्यंत आम्ही हडप केला नाही, असा खुलासा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे.
मंत्रालयात पत्रकार परिषद घेण्यात आली होती. त्यावेळी विनोद तावडे यांनी सदरील मुद्यावर आपली प्रतिक्रिया दिली. वाजपेयी यांचे स्मारक तयार करण्याबाबत दीनदयाळ उपाध्याय समितीने अर्ज केला होता. मात्र हे स्मारक तयार करण्यासाठी जे अर्ज करतील त्या सर्व अर्जांची छाननी मंत्रीमंडळ उपसमितीमार्फत केली जाणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीने दिलेल्या अहवालानंतरच कोणत्या ठिकाणी स्मारक करावयाचे याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येईल.
हेही वाचा- राज्य सरकारला पाकिस्तानी शेतकऱ्यांबद्दल प्रेम का उफाळून आले आहे ? - बाळासाहेब थोरात
पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक करण्यासाठी राज्य शासनासमोर सध्यातरी ४ जागा डोळ्यासमोर आहेत. यशवंतराव चव्हाण सेंटर जवळील जागा, बालभवन येथील एक जागा आणि उपनगरातील दोन जागा आहेत. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. त्यामुळे माध्यमांमध्ये पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मारकासाठी भूखंड हडप केल्याचे वृत्त आलेले असले, तरी ते वस्तुस्थिती तशी नाही, असा खुलासा तावडे यांनी केला. पुढील सरकारही आमचेच असेल यामुळे मुंबईत एकच नव्हे तर अटल बिहारी वाजपेयी यांचे अनेक स्मारके उभे करू, अशी माहिती देखील त्यांनी दिली.