मुंबई - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊन विषयावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मतभेद आहेत. अशा चर्चांना ऊत आला होता. यावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून त्यांनी आमची भूमिका वेगळी नाही. आमच्यामध्ये मतभेद नाहीत, असे स्पष्टपणे सांगितलं आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबद्दलची भूमिका मांडली. उलट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी योग्यवेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी सांगितले.
सामनाचे संपादक संजय राऊत यांनी शरद पवार यांची मुलाखत घेतली. यात राऊत यांनी शरद पवार यांना लॉकडाऊन विषयावरुन तुमच्यात आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत, असा प्रश्न विचारला असता पवार म्हणाले, अजिबात नाही, कसले मतभेद? मतभेद कशा करता? या संपूर्ण काळात माझा मुख्यमंत्र्याशी उत्तम संवाद होता. आजही तो आहे, असे पवार यांनी सांगितले.
लॉकडाऊन विषयावर पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊनचा निर्णय उशिरा घेतला असल्याचे अनेकांना वाटलं असेल. पण त्यांनी योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय घेतला. मुख्यमंत्र्यांचा जो स्वभाव आहे, त्याच स्वभावाला साजेसाच हा निर्णय आहे. म्हणजे, कोणताही निर्णय घ्यायचाच, तर अत्यंत सावधगिरीने. निर्णय घेतल्यानंतर दुष्परिणाम होणार नाहीत, याची खातरजमा जेवढी करुन घेता येईल तेवढी करुन घ्यायची आणि पुढचे पाऊल टाकायचे. एकदा पाऊल टाकल्यावर मागे घ्यायचे नाही, ही उद्धवची कार्यपद्धती आहे. जर उद्धव यांनी लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर आज कदाचित न्यूयॉर्कसारखी अवस्था येथे असती. मृतांची संख्या प्रचंड वाढली असती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्य सरकारचा लॉकडाऊनबाबतचा दृष्टीकोन शंभर टक्के बरोबर होता. याला आमचा सगळ्यांचा मनापासून पाठिंबा आहे.
कोरोनाचा संकटाचा सामना करताना अर्थव्यवस्था सांभाळणे, ती रुळावर आणणंदेखील गरजेचे असल्याचे मत शरद पवारांनी व्यक्त केले. 'अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्याची आवश्यकता आहे. उद्योग प्रमुखांशी केलेल्या चर्चेतून ही बाब अधोरेखित झाली. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी दिल्ली, बंगळुरूत सूट देण्यात आली. त्याची काही प्रमाणात झळ बसली. पण व्यवहार सुरळीत झाले. अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाल्यास त्याचे परिणाम कोरोनापेक्षा जास्त गंभीर होतील,' असे शरद पवार म्हणाले.
अर्थव्यवस्था सावरण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहेत. एकाचवेळी सगळे खुले करणे शक्य नाही. पण हळूहळू सुरुवात व्हायला हवी. मुख्यमंत्री त्याबद्दलचे निर्णय घेत आहेत. सावधगिरी बाळगून निर्णय घ्यायचा हा उद्धव ठाकरे यांचा स्वभाव आहे. नुकसान होणार नाही, परिणाम काय होतील, याची खातरजमा करूनच ते निर्णय घेतात, अशा शब्दांत शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर भाष्य केले.
(सौजन्य - सामना ऑनलाईन)