मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू येथील अधिश बंगल्यात बेकायदेशीर बांधकाम झाले आहे. (Narayan Rane bungalow illegal construction) कोर्ट आणि पालिकेकडून कोणताही दिलासा मिळाला नसल्याने आज राणे यांनी स्वतःच आपल्या बंगल्यातील बेकायदेशीर बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे. मात्र मुंबईमध्ये तब्बल ८४ हजाराहून अधिक बेकायदेशीर बांधकामे आहेत. (Illegal Constructions In Mumbai). यावर अद्याप कोणतीही कारवाई झाली नसल्याचे समोर आले आहे. (action on Illegal Constructions In Mumbai).
राणेंच्या बंगल्यातील बांधकाम तोडण्यास सुरुवात - मुंबईमध्ये जुहू येथील जुहू तारा रोडवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा अधिष हा बंगला आहे. या बंगल्यामध्ये पालिकेची कोणतीही परवानगी न घेता अनेक फेरबदल करण्यात आले आहे. पालिकेकडे आलेल्या तक्रारीनंतर या बंगल्याची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर बांधकाम केल्याचे निदर्शनास आले आहे. याप्रकरणी पालिकेने राणे यांना नोटीस दिली होती. राणे यांनी त्याला कोर्टात आव्हान दिले असता पालिकेकडे बांधकाम नियमित करण्यासाठी अर्ज करण्याच्या सूचना राणे यांना कोर्टाने केल्या होत्या. पालिकेने हे बेकायदेशीर बांधकाम असल्याने नियमित करण्यासाठीचा अर्ज फेटाळून लावला. राणे याविरोधात पुन्हा कोर्टात गेले. कोर्टाने तीन महिन्यात बेकायदेशीर बांधकाम पडावे असे आदेश राणे यांना दिले. राणे यांनी बांधकाम तोडले नाही तर पालिकेने ते बांधकाम तोडावे असेही आदेश कोर्टाने दिले होते. त्यामुळे राणे यांनी आज आपल्या बंगल्यातील बांधकाम तोडण्यास सुरुवात केली आहे.
८४ हजार ३६४ अनधिकृत बांधकामे - मुंबईमध्ये ८४ हजार ३६४ अनधिकृत बांधकामे झाल्याची नोंद पालिककडे नोंद आहे. त्यापैकी ५ टक्के बांधकामावर कारवाई करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रसार सुरु झाल्याने कोर्टाने अनधिकृत बांधकामावर कारवाई करू नका असे म्हटले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्यावर कोर्टाने आपले आदेश मागे घेत अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास परवानगी दिली आहे. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पालिका आयुक्तांना या बांधकामावर कारवाई करा असे आदेश दिले होते. मुख्यमंत्री, महाविकास आघाडी सरकारमधील सर्व पक्ष तसेच पालिकेतील विरोधी पक्ष आपल्या सोबत असल्याने या अनधिकृत बांधकामावर पालिका आयुक्तांनी कारवाई करून दाखवावी असे आव्हान तत्कालीन विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केले होते.
भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करा - आमच्याकडे अनेक अनधिकृत बांधकामाच्या तक्रारी येतात. त्या आम्ही कारवाईसाठी आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांना पाठवतो. कारवाई न झाल्यास आयुक्तांची भेट घेतो. आयुक्त अधिकाऱ्यांना फोन करतात. मात्र अधिकारी आयुक्तांना चुकीची माहिती देतात. पालिकेतील काही अधिकारी खूप चांगले काम करत आहेत. मात्र काही अधिकारी अनधिकृत बांधकामाला पाठीशी घालत आहेत. यामुळे पालिका आयुक्तांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी असे आवाहन रवी राजा यांनी केले होते. एखाद्या झोपडी धारकारने बांधकाम केल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मात्र मोठया इमारातींमध्ये जे बांधकाम होते त्याच्यावर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते असे रवी राजा म्हणाले होते.
मालमत्ता कराच्या दुप्पट दंड - मुंबई महानगर पालिकेचा 2022-23 या वर्षीचा 45149.21 काेटी रुपयांचा अर्थसंकल्प पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सादर केला. यात काेणतीही करवाढ सुचवलेली नाही. मात्र अनधिकृत बांधकामावर मालमत्ता कराच्या दुप्पट दंड आकारणी करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. अनधिकृत बांधकाम असलेल्या ठिकाणी अधिकाऱ्यांना पोहचता येत नाही. नोटीस देणे, कोर्टकचेरी यामुळे बेकायदेशीर बांधकामाला आळा बसत नाही. पालिकेने बेकायदेशीर बांधकामासाठी मालमत्ता कराच्या दुप्पट दंड आकारणी करण्याचा निर्णय घेतला आहे. या कराच्या बोजामुळे बेकायदेशीर बांधकामाला आळा बसू शकते अशी प्रतिक्रिया माजी नगरसेवक सुरेश कोपरकर यांनी दिली आहे.