मुंबई - शुक्रवारी कांदळवन भूमीपूजनाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी आपल्या संभाषणात सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर गेल्यास प्रदूषणामुळे नाक बंद करून उभे राहावे लागते, ही गोष्ट शोभणारी नाही. बकाल मुंबई हे आपले स्वप्न नाही. पाऊस पडला की मुंबई का तुंबते? असा सवाल करत मुंबई महापालिकेत सत्तेत असलेल्या शिवसेनेला चिमटे काढले.
बोरिवलीच्या शिंपोली येथे असलेल्या अटल स्मृती उद्यानात आयोजित कांदळवन भूमीपूजनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, मुंबई सुंदर व्हावी यासाठी मी विनोद तावडे यांना मुंबईच्या पुढील २५ वर्षाच्या व्हिजनवर पुस्तक लिहायला सांगितले होते. परंतु, त्यांनी ते लिहिले नाही. त्यामुळे आता मी हे काम आमदार अतुल भातखळकर यांना सांगत असून त्यासाठी मी देखील सल्लागार म्हणून मदत करणार असल्याचे गडकरी म्हणाले. मुंबईत वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू करा, येणाऱ्या काळात समुद्र हा वरदान ठरेल. मुंबईचा समुद्र हा मॉरिशस सारखा दिसला पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
या कार्यक्रमात गडकरी यांनी सेनेच्या कारभारावर चिमटे काढत मुंबई ही कशी तुंबते, यावर चिंता व्यक्त केली. दरम्यान, या कार्यक्रमाला मुंबईचे महापौर यांच्यासह सेनेचा एकही नेता उपस्थित नव्हता, केवळ एक पदवीधर आमदार आले होते. गडकरी पुढे म्हणाले की, अटल बिहारी वाजपेयी यांनी कायम राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रवाद याचा विचार सांगितला, त्यावर आपण चालत आहोत. त्याच विचाराने सर्वांनी एकत्र येऊन चांगले काम करण्याची गरज आहे. आपण जे सिध्दांत स्वीकारले आहे, त्यातून आणि सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण देशाला एका सुपर इकॉनॉमी बनवत आहोत. मात्र, हे करत असताना जल आणि वायू प्रदूषण ही समस्या मोठी गंभीर झाली असून त्यावर काम करण्याची गरज आहे. आपल्या सगळ्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून जल-वायू प्रदूषण मुक्त जीवन जगण्यासाठी सर्वांनी काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.
यासाठी त्यांनी सॉलिड बेस्ट आणि लिक्वीड बेस्ट मॅनेजमेंट यातून शहरांचा विकास करता येऊ शकतो, यासाठीची अनेक उदाहरणे दिली. आम्ही नागपुरातील टॉयलेटचे पाणी वीज निर्मिती करिता सरकारला विकतो, आमच्याकडे ते सुरू आहे तेच मुंबईकरांना करता येईल आणि यातून जलप्रदूषण रोखता येईल अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.