मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत कर्जतमधील त्यांच्या एन डी स्टुडिओमध्ये आढळला आहे. ते 58 वर्षांचे होते. नितीन चंद्रकांत देसाई यांनी गळफास घेऊन स्वतःची जीवनयात्रा संपवली असावी, असा प्रथमदर्शनी अंदाज आहे. त्यांच्या मृतदेहाच्या आसपास कोणत्याही प्रकारची 'सुसाइड नोट' मिळालेली नाही. त्यांच्या अशा पद्धतीने झालेल्या मृत्यूमुळे चित्रपटसृष्टीत खळबळ उडाली आहे.
नितीन देसाई यांचे नाव चित्रपटसृष्टीतील अग्रगण्य कला दिग्दर्शकांमध्ये घेतले जाते. आपल्या कारकिर्दीत परिंदा, हम दिल दे चुके सनम, 1942 - अ लव्हस्टोरी, राजूचाचा, रंगीला, दौड, इश्क, देवदास, हरिश्चंद्राची फॅक्टरी सारख्या अनेक भव्य चित्रपटांचे कला दिग्दर्शन नितीन चंद्रकांत देसाई यांनी केले. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्यांनी आपल्या मनात आत्महत्येचे विचार घोळत असल्याचे सांगत स्वतःच्या व्यथेला वाट मोकळी करुन दिली होती. ते वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर आले, असे त्यांच्या सुह्रदांना वाटत असताना त्यांच्या अशा पद्धतीने मृत्यूची बातमी आली आहे.
कायम भव्यतेचा ध्यास - नितीन चंद्रकांत देसाई यांना त्यांच्या कला दिग्दर्शनातील योगदानाबद्दल राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांचे देदीप्यमान जीवनचरित्र सांगणारी 'राजा शिवछत्रपती' ही त्यांची निर्मिती असलेली मालिका मराठी दूरचित्रवाहिनीवर खूप यशस्वी ठरली होती. या मालिकेत छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा साकारणारे डॉ. अमोल कोल्हे पुढे खासदार झाले. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार आहेत. कायम भव्यतेचा ध्यास घेतलेल्या नितीन चंद्रकांत देसाई यांच्यासारख्या प्रगल्भ कलावंताच्या जीवनाची अशा पद्धतीने झालेली अखेर अनेकांच्या मनाला चुटपुट लाऊन गेली आहे.
नितीन देसाई यांनी आज पहाटे साडेचार वाजता त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओ मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक तंगी असल्याकारणाने त्यांनी आत्महत्या केली आहे- आमदार महेश बालदी, खालापूर कर्जत
मी मुख्यमंत्री असताना देसाई यांनी मरीन लाईन्स येथे आयोजित 'मॅग्नेटिक महाराष्ट्र' कार्यक्रम व्यवस्थेचे यशस्वी संयोजन त्यांनी केले होते. हा हरहुन्नरी कलावंत असा अचानक आपल्याला सोडून जाईल, अशी कल्पनाही केली नव्हती. कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची ताकद प्राप्त होवो, अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीनजी देसाई यांच्या दुर्दैवी निधनाची बातमी माझ्यासाठी अत्यंत धक्कादायक असून यावर विश्वास बसत नाही. कला क्षेत्रातील माझ्या आजवरच्या प्रवासात मला लाभलेले नितीन दादांचे मार्गदर्शन व साथ खूप मोलाची ठरली आहे. ज्या 'राजा शिवछत्रपती' मालिकेत मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची संधी मिळाली, त्या मालिकेचे निर्माते नितीन दादाच होते. त्यांच्या अचानक जाण्याने मनात पोरके झाल्याची भावना निर्माण झाली आहे. नितीन दादांच्या आत्म्यास चिरशांती लाभो, हीच आई-जगदंबेचरणी प्रार्थना! - खासदार -अभिनेता डॉ. अमोल कोल्हे
कर्जबाजारी झाल्यामुळे आत्महत्या? - सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन चंद्रकांत देसाई यांनी एका वित्तीय संस्थेकडून सुमारे 180 कोटी रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी त्यांनी तारण म्हणून अनुक्रमे 26, 5.89 आणि 10.75 एकर अशा तीन मालमत्ता ठेवल्या होत्या. कर्जाची रक्कम अडीचशे कोटी रुपयांच्या घरात गेल्याची सूत्रांची माहिती आहे. सदर वित्तीय कंपनीने कर्जखाते दुसऱ्या कंपनीकडे सोपवले. कर्जवसुलीसाठी देसाई यांच्याकडे वित्तीय कंपनीने अक्षरशः तगादा लावला होता. कर्ज वसूल न झाल्यास देसाई यांची मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळावी, असा विनंती अर्ज रायगड जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाला होता. 2002 (सरफेसी) कायद्यात मालमत्ता जप्त करून कर्जाची रक्कम वसूल करण्याची तरतूद आहे. मात्र देसाई यांच्या स्टुडिओबद्दल अशा पद्धतीचा निर्णय झाल्याची ठोस माहिती नाही. कर्जबाजारी झाल्याने आणि कर्जाची परतफेड करु न शकल्याने नितीन देसाई यांनी आत्महत्या केली असल्याची शक्यताही वर्तवली जात आहे.