मुंबई Ravindra Chavan On Nilesh Rane : मंत्री रवींद्र चव्हाण तसंच निलेश राणे यांनी सागर बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. तब्बल दीड तास तिघांमध्ये चर्चा झाली. भेटीदरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निलेश राणेंकडून नाराजीचं कारणं समजून घेतल्याचं चव्हाण यांनी माध्यमांना सांगितलंय.
निलेश राणे राजकारणात सक्रिय होणार : सागर निवासस्थानी झालेल्या बैठकीनंतर मंत्री रवींद्र चव्हाण तसंच निलेश राणे दोघेही बाहेर पडले. यावेळी माध्यमांना माहिती देताना रविंद्र चव्हाण म्हणाले की, काल निलेश राणे यांनी ट्विट केल्यानंतर प्रत्येकाला नक्की काय घडलं कळतं नव्हतं. अशा प्रकारचं ट्विट करण्याचं नेमकं कारण काय? परंतु त्यानंतर निलेश राणे यांच्याकडे विचारपूस केली. आज सकाळी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी पोचलो. सर्व विषयाबाबत माहिती घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याविषयी निलेश राणे यांच्यासोबत चर्चा केल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.
कार्यकर्त्यांवर अन्याय : संघटनेत काम करणाऱ्या प्रत्येक छोट्या-मोठ्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. छोट्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये म्हणून राजकारणातून निवृत्त होण्याची भूमिका घेतली होती, असं निलेश राणे यांचं मत आहे. जेव्हा छोटा कार्यकर्ता काम करतो, त्यावेळी त्या कार्यकर्त्यांच्या असलेल्या अडचणी सर्व लोकांनी जाणून घेतल्या पाहिजेत. या सगळ्या विषयांमध्ये आम्ही सर्वांनी या गोष्टींचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, असं निलेश राणे यांचं मत आहे. त्यांचं मत बरोबरच आहे. कोणावरही अन्याय होता कामा नये, अशी भाजपाची भूमिका असल्याचं चव्हाण यांनी म्हटलंय.
रागावून निवृत्तीचा निर्णय : स्थानिक स्तरावरील निवडणुकीबाबत छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना देखील आपण जाणून घेतला पाहिजेत, त्या छोट्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून न घेतल्यामुळं निलेश राणे नाराज होते. कार्यकर्त्यांवर प्रेम करणारे असे निलेश राणे नेते आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना नेत्यांपर्यंत पोहोचत नसतील, तर मग त्याला काही अर्थ नाही. या दृष्टिकोनातून त्यांनी रागावून का होईना राजकारणातील निवृत्तीचा निर्णय घेतला होता. या सर्व गोष्टींमध्ये आम्ही सर्वजण लक्ष घालणार असल्याचं आश्वासन निलेश राणे यांना दिलं आहे.
फडणवीस-राणे-चव्हाण भेटीत नेमकं काय घडलं - तिघांच्या भेटीनंतर रविंद्र चव्हाण यांनी माध्यमांच्या समोर येऊन माहिती दिली. तसंच त्यांनी समजूत काढल्याचं सांगितलं. मात्र या भेटीत निलेश राणे यांनी रविंद्र चव्हाण यांच्याबाबतची नाराजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोलून दाखवल्याची माहिती मिळत आहे. चव्हाण आपल्याला विश्वासात घेत नाहीत, आपल्या कार्यकर्त्यांवरही अन्याय होतोय अशी तक्रार निलेश राणे यांनी फडणवीस यांच्याकडे केली. फडणवीस यांनी दोघांची समजूत काढून सबुरीचा सल्ला दिला. त्याचवेळी निलेश राणे यांच्या पुढील राजकीय वाटचालीबद्दलही चर्चा झाल्याचं वृत्त आहे. मात्र त्याचा खुलासा लवकरच स्वतः निलेश राणे करतील अशी अपेक्षा आहे. मात्र ते काहीच बोलले नसल्यानं त्यांना काही ठोस आश्वासन मिळालेलं दिसत नसल्याचा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.
फडणवीसांसोबत सकारात्मक चर्चा : आम्ही पुन्हा असं काही होणार नाही असा आग्रह निलेश राणे यांच्याकडं धरला आहे. आम्ही कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घेऊ. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक अतिशय सकारात्मक झाली आहे. निलेश राणे यांच्या नेतृत्वामध्ये सिंधुदुर्ग असेल किंवा कोकणातील भागांमध्ये त्यांचा झंजावात आहे. हा झंजावात येणाऱ्या काळात असाच सुरू राहील असा विश्वास मंत्री रवींद्र चव्हाण यांनी व्यक्त केला आहे. यावेळी नितेश राणे यांनी प्रसार माध्यमांना प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. मात्र येणाऱ्या काळात पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांचा कुडाळ, मालवण मतदार संघामधील हस्तक्षेप कमी होतो का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा -