मुंबई Corona JN1 : कोविड-19 चा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढत आहे. अशातच कोरोनाचा नवीन प्रकार JN1 चा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने, आता यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एका व्यक्तीमध्ये JN1 चा विषाणू आढळून आला आहे. हा रुग्ण दोडामार्ग तालुक्यातील रहिवासी आहे. त्याआधी ठाणे जिल्ह्यातील कळवा येथे देखील कोरोनाच्या नव्या विषाणूचा रुग्ण आढळून आला होता. आता कोरोनाचा नवा विषाणू मुंबईच्या वेशीपर्यंत आल्यानं, बृहन्मुंबई महानगरपालिकेचं आरोग्य प्रशासन पुढच्या तयारी लागलं आहे. बुधवारी महानगरपालिकेच्या अखत्यारीतील रुग्णालयांमध्ये मॉकड्रिल घेण्यात आली. प्रशासनाने सध्यस्थितीचा आढावा घेतला. या निमित्ताने, मुंबईतील नेकमी काय स्थिती आहे? तसंच काय काळजी घ्यायला हवी? हे आज जाणून घेणार आहोत.
आरोग्य विभागाकडून सूचना : यासंदर्भात पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, देशभरात रुग्ण झपाट्याने वाढत असल्यानं आम्हाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून नव्या गाईडलाईन आल्या आहेत. त्यात आम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत की, जी प्रकरणे नोंदवली जात आहेत, त्यावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळंच आम्ही मुंबईतील सर्व प्रयोगशाळांना सांगितलं की, प्रयोगशाळेत कोरोनाचे कोणतेही प्रकरण आढळल्यास त्याची माहिती पालिकेला द्यावी. मुंबईत कोरोनाची चाचणी करणाऱ्या 200 हून अधिक प्रयोगशाळा आहेत. या सर्व प्रयोगशाळांना पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. सोबतच या प्रयोगशाळांमधून जी काही माहिती मिळेल ती सर्व माहिती बीएमसी वेबसाइटवर अपलोड करता येणार आहे.
नवीन विषाणू आणि त्याची क्षमता खूपच सौम्य : या संदर्भात सर्व रुग्णालयांच्या डीनसोबत पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुधाकर शिंदे यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीत रुग्णसंख्या अशाच प्रकारे झपाट्याने वाढल्यास पालिकेची रुग्णालये किती सज्ज आहेत, किती बेड, ऑक्सिजन आणि आयसीयू बेड तयार आहेत? याची माहिती देखील या आढावा बैठकीत घेण्यात आली. मुंबईत सध्या सेव्हन हिल्स हॉस्पिटल आणि कस्तुरबा रुग्णालय येथे कोरोना रुग्णांसाठी राखीव बेड ठेवण्यात आले आहेत. तसेच एक मॉक ड्रिल देखील घेतली आहे. या सर्व बाबींची नोंद प्रशासकीय विभागाने घेतली आहे. कोरोनाचा हा नवीन विषाणू आणि त्याची क्षमता खूपच सौम्य असल्याने फक्त थंडी आणि ताप अशी लक्षणे दिसतील. ज्यांना ही लक्षणे आहेत त्यांनी तपासणी करून घ्यावी. येत्या काही दिवसांत रुग्णांची संख्या वाढू शकते. पण, काळजी करण्यासारखं काही नाही, अशी माहिती प्रशासनाने दिलीय.
लोकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी : या संदर्भात ईटीव्हीशी बोलताना पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कार्यकारी अधिकारी डॉक्टर दक्षा शाह यांनी सांगितलं की, देशातील इतर विभागांच्या आणि इथल्या लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईत कोविड रुग्णांची संख्या फार कमी आहे. इन्फ्लूएन्झा आणि विषाणूजन्य तापाचे रुग्ण सामान्यतः हिवाळ्याच्या हंगामात वाढल्याचं दिसून येतं. सध्या मुंबईत जे काही कोविड रुग्ण आढळत आहेत, त्यांची योग्य तपासणी आणि काळजी पालिका घेत आहे. लोकांनी घाबरून न जाता दक्षता घ्यावी. रुग्णसंख्या वाढली तर पालिकेची पूर्णपणे तयारी आहे. पालिकेने सर्वे करण्यास सुरुवात केलीय. अशा स्थितीत सध्या तरी मास्क सक्ती करण्याचं कोणतंही कारण नाही. मात्र, ज्यांना इतर आजार आहेत त्यांनी मास्क जरूर वापरावा. असं आवाहन डॉक्टर शाह यांनी केलंय.
हेही वाचा -