मुंबई : राज्यात आज ६९४ रुग्णांची नोंद झाली आहे. आज राज्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आज १८४ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत ८१ लाख ४३ हजार ६८६ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७९ लाख ९२ हजार २२९ रुग्ण बरे झाले आहेत. तर, १ लाख ४८ हजार ४४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या ३०१६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.
मुंबईत १९२ रुग्ण : मुंबईत आज १९२ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचा आकडा ११ लाख ५६ हजार ९१६ वर पोहचला आहे. मुंबईत गेले काही दिवस एकही मृत्यू झाला नसल्याने, मृत्यूचा आकडा १९ हजार ७४७ वर स्थिरावला आहे. ११ लाख ३६ हजार ३२३ रुग्ण बरे झाले आहेत. मुंबईत सध्या ८४६ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. ५५ रुग्ण रुग्णालयात दाखल असून त्यापैकी २८ रुग्ण ऑक्सीजनवर आहेत.
राज्य सरकार सज्ज : राज्यात सोलापूरमध्ये, सांगली, पुणे, कोल्हापूर, नाशिक, अहमदनगर या सहा जिल्ह्यातील पॉजीटिव्हीटी रेट सहा पटीने वाढला आहे. कोरोना वाढत असल्याने आरोग्य विभागाने कोविड रुग्णालये १५८९, आयसोलेशन खाटा ५१३८०, ऑक्सीजन बेड ४९८८९, आय. सी. यू. बेड १४४०६, व्हेंटीलेटर्स ९२३५ सज्ज ठेवली आहेत. ऑक्सिजनची कमी पडणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
मुंबईत १ एप्रिल पासून वॉर्ड वॉर रूम पुन्हा सुरू : कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून रुग्णांना हॉस्पिटलमध्ये बेडस मिळावेत, रुग्णवाहिका, माहिती मिळावी यासाठी पालिकेच्या २४ वार्डमध्ये वॉर्ड वॉर रूम सुरू करण्यात आले होते. या वॉर्ड वॉर रुममुळे रुग्णांना सहज खाटा उपलब्ध होऊ लागल्या. कोरोना प्रसार कमी झाल्यावर हा वॉर रूम बंद करण्यात आला. आता पुन्हा रुग्ण वाढू लागल्याने १ एप्रिल पासून सकाळी ७ ते रात्री १० या कालावधीत वॉर रूम पुन्हा सुरू केले जाणार आहेत. खासगी रुग्णालयात १० टक्के बेड राखीव ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
हेही वाचा : Uddhav Thackeray On CM : धनुष्यबाण चोरला, तरी ब्रह्मास्त्र माझ्यासोबत; उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला सुनावले