मुंबई - गेल्या 24 तासात मुंबईमध्ये कोरोनाचे नव्याने 357 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 11 जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 4 हजार 589 झाली असून, आतापर्यंत 179 जणांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात कोरोनाचे नव्याने 357 नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी 189 रुग्ण काल सायंकाळपासून आढळले तर 20 आणि 21 एप्रिलला खासगी प्रयोगशाळेमध्ये चाचणी केलेले 168 जण पॉझिटिव्ह आले आहेत. मुंबईत गेल्या 24 तासात 11 जणांचा मृत्यू झाला त्यात 7 जणांना दीर्घकालीन आजार होते. 11 मृत्यूपैकी 7 पुरुषांचा तर 4 महिलांचा मृत्यू झाला आहे. ज्यांचा मृत्यू झाला त्यात एकाचे वय 80 वर्षं, एका रुग्णाचे वय 40 च्या खाली होते, इतरांचे वय 40 ते 80 वर्षा दरम्यान आहे.
मुंबईमधील एकूण 4 हजार 589 कोरोनाचे रुग्ण आहेत, त्यापैकी 1 हजार 795 रुग्ण पॉझिटिव्ह रुग्णाच्या जवळचे नातेवाईक यांच्यामध्ये राबवलेली शोध मोहिम, रुग्ण भेटल्या त्या विभागात म्हणजेच प्रतिबंधित क्षेत्र यात राबविण्यात आलेली उपाययोजना आणि सर्वेक्षणातून समोर आले आहे. 5 ते 24 एप्रिल दरम्यान कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्या ठिकाणच्या घेण्यात आलेल्या 184 क्लिनिकमध्ये 7 हजार 203 लोकांची तपासणी करण्यात आली त्यामधून 2 हजार 494 लोकांचे नमुने घेण्यात आले.