मुंबई - आपल्या वादग्रस्त वक्तव्याने नेहमी चर्चेत असणाऱ्या अमृता फडवणीस यांनी नव्याने केलेल्या ट्विटमुळे पुन्हा नवा वाद निर्माण झाला आहे. यावेळी त्यांनी मुंबई आणि मुंबई पोलिसांच्या विरोधात बोलणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत हिची बाजू घेतली आहे. कंगनाची बाजू मांडल्याने नेटकऱ्यांनीही अमृता फडणवीस यांना धारेवर धरले आहे.
''एखाद्याने मत व्यक्त केल्यास कदाचित त्या मतांशी आपण सहमत होणार नाही. परंतु लोकशाहीत आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क आहे. आपल्याला बोलण्याचे, श्रद्धेचे, चळवळीचे आणि माध्यमांचे स्वातंत्र्य आहे'', असे ट्विट अमृता फडणवीस यांनी केले आहे. त्यांनी शिवसेनेला टोलाही लगावला आहे. ''टीका करण्याचे आपल्याला स्वतंत्र आहे. मात्र, टीकाकाराच्या फोटोला चप्पल मारणे, ही अत्यंत हीन पातळी आहे'', असे त्यांनी म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस यांनी मुंबई असुरक्षित असल्याचे ट्विट केले होते. यावरून त्यांच्यावर तीव्र टीका झाली होती. कंगनानेही मुंबई पोलिसाविरोधात ट्विट केल्यानंतर अमृता फडणवीस ही ट्विट करतील अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार त्यांनीही ट्विट करून या वादाला तोंड फोडले आहे. सध्या कंगनाही शिवसेनेच्या विरोधात आहे. अमृता याही शिवसेनेविरोधात बोलण्याची एकही संधी सोडत नाही. शिवसैनिकानी कंगनाच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. याच आंदोलनाविरोधात ट्विट करत अमृता यांनी कंगनाची बाजू घेतली आहे.