मुंबई - राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारासंदर्भात विरोधक केवळ टीका आणि राजकारण करत असतात. त्यांना अत्याचाराबाबत काही देणे-घेणे नसते, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. तसेच आम्ही त्याकडे लक्ष देत नाही, असेही त्या म्हणाल्या.
सह्याद्री अतिथीगृहात मंगळवारी राज्यातील महिलांच्या अत्याचारासंदर्भात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नेतृत्वाखाली महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुप्रिया सुळे यांच्यासोबतच राज्यातील महिला लोकप्रतिनिधी, विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी चाकणकर म्हणाल्या, आज सरकारकडून राज्यातील महिला अत्याचारासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. एकूणच राज्यातील आजची परिस्थिती काय आहे, हे वेगवेगळ्या सामाजिक संस्थांच्या माध्यमातून सरकारकडून जाणून घेण्यात आले. विशेष म्हणजे या बैठकीत सामाजिक संस्थांनी आणि आम्हीही अनेक प्रकारच्या सूचना सरकारला केल्या आहेत. त्यातून महिला अत्याचार रोखण्यासाठी काय करता येईल? आणि त्यावर कोणत्या चांगल्या उपाय योजना प्रभावी ठरतील? यावर प्रामुख्याने चर्चा झाली, अशी माहितीही चाकणकर यांनी दिली.
दरम्यान, भाजपाच्या महिला अध्यक्ष चित्रा वाघ यांनी मागील काही दिवसांपासून सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. त्यावर वाघ यांचे नाव न घेता चाकणकर म्हणाल्या की, राज्यातील महिला अत्याचारांच्या संदर्भात विरोधक केवळ राजकारण करत असतात. त्यांना अत्याचारासंदर्भात काही देणे घेणे नसते, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.