मुंबई : कर्नाटकात (Border Disputes) मराठी बांधवांवर सुरू असलेले हल्ले थांबले नाही, तर आपण सीमा भागात येऊ असा इशारा शरद पवार (Sharad Pawar) यांनी कर्नाटक सरकारला दिला होता. गुरुवारी सकाळी सीमा भागातील लोकांशी संपर्क साधल्यानंतर शरद पवार यांना तिथे शांतता असल्याची माहिती दिली. त्यानंतर संध्याकाळी काही घटना घडल्या. त्याचा स्वतंत्रपणे विचार आहे. मात्र पवारांनी स्वतः तिकडे येतो बोलल्यानंतर कर्नाटकच्या भाषेत नरमाई आलेली आहे. त्यांनाही लक्षात आले आहे काय होऊ शकते, त्यामुळे महाराष्ट्रातील मराठी जनता सीमा भागात आहे. त्या जनतेला त्रास दिला तर, महाराष्ट्र त्यांच्या मागे उभा आहे हा एक मोठा संदेश शरद पवार यांनी दिला. त्यामुळे आता जास्त अनुचित प्रकार करण्याचे धाडस त्यांचे होणार नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (NCP State President Jayant Patil) यांनी आज प्रदेश कार्यालयात प्रसारमाध्यमांशी संवाद (interacted with media at state office in Mumbai) साधताना व्यक्त केलं.
दिल्लीला त्रास होतो : सीमा भागातील वादाबाबत खासदारांना बोलू देण्यात आले नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाबाबत बोलत असतांना, खासदार अमोल कोल्हे यांचा माईक बंद करण्याचे पाप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव जरी घेतले तरी, दिल्लीला त्रास व्हायला लागला आहे. भाजपच्या सभापतींनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना थांबवले, ही गंभीर व निषेध करणारी बाब आहे, असेही जयंत पाटील यांनी सांगितले.
तर भाजपाचे मुख्यमंत्री : राज्यात घडणाऱ्या सगळ्या विषयावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मूग गिळून गप्प बसले आहेत. जे काही आहे ते कर्नाटकचे मुख्यमंत्रीच बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्राने कधीच पाहिला नाही, असे स्पष्ट करतानाच सीमा प्रश्न सुप्रीम कोर्टात आहे. त्याच्या तारखा लागतीलm पण हे चित्र जाणीवपूर्वक निर्माण करण्याचा प्रयत्न कर्नाटकचे मुख्यमंत्री करत आहेत आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे नाहीतच ते भाजपचेच मुख्यमंत्री असल्यासारखे वागत आहेत. त्यामुळे ते कोणताच बाणेदारपणा दाखवत नाहीत, हीच समस्या महाराष्ट्राच्या मनात आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली.
सरकारच्या विरोधात विराट मोर्चा : सध्या लोकभावनेचा उद्रेक झालेला आहे. लोकं सरकारच्या विरोधात गेली आहेत. सीमा प्रश्नावरुन राज्यातील काही गावातील लोकं कर्नाटक, गुजरात, तेलंगणा या राज्यात जातो बोलत आहेत. असा प्रकार महाराष्ट्रात कधीच झाला नाही. एकनाथ शिंदेचे सरकार महाराष्ट्राला एकसंघ ठेवण्यातही अपयशी ठरले आहे. त्या भागातील जनतेला या सरकारबद्दल अविश्वास वाटायला लागला आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीच्या मोर्चाला फार मोठा प्रतिसाद मिळणार आहे, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.