मुंबई - उदयनराजे भोसले यांनी शनिवारी खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. या त्यांच्या प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी टीका केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक जमिनी विकण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून, उदयनराजे भाजपमध्ये गेल्याचे वक्तव्य मलिक यांनी केले. मात्र, महाराजांचा ऐतिहासिक वारसाला कोणी धक्का लावत असेल तर जनतेला सोबत घेऊन आम्ही कडाडून विरोध करू असेही मलिक म्हणाले.
उदयनराजे भोसले यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या भाजप प्रवेशाने सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीला मोठे खिंडार पडले आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे राज्यात ४ खासदार निवडून आले होते. त्यापैकी उदयनराजे हे एक होते. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. साताऱ्यात लोकसभेसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत जनता उदयनराजेंचा पराभव करेल असेही मलिक म्हणाले. सत्तेची चटक लागल्यानेच अनेक नेते पक्षांतर करत असल्याचेही ते म्हणाले.