मुंबई - महाराष्ट्राच्या विकास कामासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आलेला ४० हजार कोटी रुपयांचा निधी परत गेला असेल, तर याची नैतिक जबाबदारी स्वीकारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाय उतार व्हावे लागेल, अशी परखड प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.
महाराष्ट्राला आलेला 40 हजार कोटी रुपयांचा निधी परत केंद्राला पाठवण्यासाठीच देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत नसताना मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली, असे ट्विट भाजपचे खासदार अनंत हेगडे यांनी केले आहे. भाजपच्या नेत्याने असे ट्विट करणे गंभीर आहे. याची माहिती जनतेपुढे आली पाहिजे, असेही मलिक म्हणाले.
महाराष्ट्रासाठी आलेला निधी खरच परत गेला असेल, तर केवळ महाराष्ट्र नाहीतर तामिळनाडू, ओडिशा अशा गैरभाजप शासित राज्यांवर अन्याय केल्यासारखे होईल, असेही नवाब मलिक म्हणाले.