मुंबई - भीमा कोरेगाव प्रकरणात आयोगासमोर ( Bhima Koregaon Investigation Commission ) साक्ष नोंदवण्यासाठी तारीख पुढे वाढवून मिळावी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP Chief Sharad Pawar ) यांनी चौकशी आयोगाकडे पुढच्या तारखेची मागणी करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शरद पवार यांनी आज सकाळी मुंबईतील चौकशी आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावली. तिथे जवळपास एक तास शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यात आली. याबाबत सविस्तर साक्ष नोंदवता यावी यासाठी आपल्याला या पुढची तारीख देण्यात यावी अशा प्रकारची मागणी शरद पवार यांच्याकडून आज करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.
याआधीही नोंदविली साक्ष -
भीमा कोरेगाव प्रकरणात शरद पवार यांची साक्ष नोंदवण्यासाठी चौकशी आयोगाने 23 फेब्रुवारीला चौकशी आयोगासमोर उपस्थित राहण्यासाठी समन्स दिला होता. 1 जानेवारी 2018ला भीमा कोरेगाव येथे दोन समाजामध्ये मोठा हिंसाचार झाला होता. या हिंसाचाराबाबत शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यानंतर याप्रकरणात त्यांचेही साक्ष नोंदविण्यात यावी, असा अर्ज तत्कालीन राज्य सरकारने चौकशी आयोगाकडे केला होता. त्यानुसार शरद पवार यांची याआधी ही साक्ष नोंदवण्यात आली होती. तसेच याप्रकरणी चौकशी आयोगाने येत्या 23 फेब्रुवारीची तारीख दिली होती. या तारखेला चौकशीसाठी उपस्थित राहता येणार नसल्याने शरद पवार यांनी पुढची तारीख मागितली असल्याची माहिती समोर येत आहे.
1 जानेवारी 2018मध्ये भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेनंतर राज्यभरात तणावाचे वातावरण होतं. या प्रकरणात संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे ज्यांच्याविरोधात पुणे ग्रामीण पोलीसमध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर या प्रकरणात गुन्ह्यांची नोंद करण्यात आली होती.