मुंबई : मणिपूरमधील महिलांवरील अत्याचार प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून आज मौनव्रत आंदोलन केले जात आहे. मणिपूरमध्ये दोन महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर संपूर्ण देशात संतापाची लाट पसरली आहे. भाजपा विरोधातील सर्वच पक्षांनी मणिपूर येथील घटनेचा निषेध केला. मणिपूर सरकार आणि भाजपा विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने मुंबईसह राज्यभर निदर्शने केली.
आज मौनव्रत आंदोलन : मणिपूरमधील आदिवासी आणि बिगर आदिवासी यांच्यातील संघर्षातून दोन महिलांवर झालेल्या अत्याचाराचे प्रकरण सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले होते. त्यानंतर देशभरात मणिपूर सरकार विरोधात व्यक्त केला जात होता. या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातही शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज मुंबईसह राज्यभर मौन आंदोलन करण्यात येणार आहे. आंदोलनासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षाच्या सर्वच सेलच्या पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे.
महिला शिवसैनिकांनी केले पुण्यात आंदोलन : मणिपूर घटनेच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटाने निदर्शने केली होती. आंदोलनावेळी आक्रमक झालेल्या महिला शिवसैनिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मणिपूर येथील मुख्यमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. त्यावेळी मणिपूर सरकार आणि केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली होती.
कॉंग्रेसचे आंदोलन : मणिपूरमधील हिंसाचार प्रकरणावरून पुण्यात काँग्रेस पक्षाकडून आंदोलन करण्यात आले होते. यावेळी हिंसाचार घटनेचा आणि केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांचा निषेध करण्यात आला होता. मणिपूरमधल्या जाती जातीमध्ये भांडण लावून, राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न भाजपाने केला आहे, असे आंदोलनादरम्यान कॉंग्रेस नेते म्हणाले होते. यावेळी काँग्रेस कार्यकर्ते, महिला, विविध पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले होते. ठाण्यात देखील प्रदेश काँग्रेस सचिव शिल्पा सोनोने यांनी आपले केस कापून भर पावसात रस्त्यावर लोळून या घटनेचा निषेध व्यक्त केला होत.
हेही वाचा :