मुंबई: दिल्ली येथील महाराष्ट्र सदनामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात आलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा पुतळा लावण्यात आला. मात्र, त्यामागे असलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्यात आले. या दोन कर्तबगार महिलांचे पुतळे दिसू नयेत यासाठीच राज्य सरकारने हा डाव आखला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना त्यांच्या समोरच हे पुतळे हटवले जात असताना ते केवळ बघ्याची भूमिका घेऊन होते. त्यामुळे ही अत्यंत चिंतेची बाब असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
महाराष्ट्र सदन येथे काल घडलेली घटना निंदनीय आहे. ज्यामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटवून तेथे सावरकारांचा पुतळा लावल्या गेला. सावरकरांचा पुतळा लावण्याला विरोध नाही. मात्र, कर्तबगार महिलांचा पुतळा हटविण्याचा निषेध महाराष्ट्रातील जनता करेल. - जयंत पाटील, राकॉं प्रदेशाध्यक्ष
कर्तबगार महिलांचा द्वेष का? महाराष्ट्रातील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातील महिलांना शिक्षणाची वाट दाखवली. ज्यांनी महाराष्ट्र उभा करण्यात महत्त्वाचे योगदान दिले. तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी स्वतःच्या प्राण्यांची बाजी लावत राज्याचे रक्षण केले. अशा दोन कर्तबगार महिलांबाबत सरकारला का द्वेष आहे? या दोन महिलांचे पुतळे हटवण्यामागे सरकारचा काय उद्देश आहे. महिलांचे पुतळे ठेवायचेच नाहीत ही भूमिका ठेवून हा कार्यक्रम झाला. त्यामुळे या महिलांच्या बाबत सरकारच्या मनात काय भूमिका आहे, हे महाराष्ट्राला कळले असा टोला जयंत पाटील यांनी यावेळी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस कडून जोरदार आंदोलन: दिल्ली येथे झालेल्या या पुतळे हटवण्याच्या घटनेचे महाराष्ट्रात पडसाद उमटत आहे. विविध ठिकाणी आज राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार निदर्शने केली. मुंबईतील राष्ट्रवादीच्या विभागीय कार्यालयासमोर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे ठेवत राष्ट्रवादी काँग्रेसने सरकार विरोधी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले.
शाहू, फुले ,आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा उल्लेख करायचा. आणि दुसरीकडे माफीवीर सावरकरांच्या जयंतीसाठी या महापुरुषांचा मुद्दाहून अपमान करायचा आणि जाती- जातीत वाद भडकवू देण्याच काम भाजप सातत्याने करत आली - यशोमती ठाकूर
भाजपवर टीका - एकीकडे महाराष्ट्रात मत मागत असताना शाहू, फुले ,आंबेडकर, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकरांच्या नावाचा उल्लेख करायचा. आणि दुसरीकडे माफीवीर सावरकरांच्या जयंतीसाठी या महापुरुषांचा मुद्दाहून अपमान करायचा आणि जाती- जातीत वाद भडकवू देण्याच काम भाजप सातत्याने करत आली. महाराष्ट्र सदनाबाहेरील सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर यांचा पुतळा हटवून भाजपणे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा अपमान केला आहे. हा अपमान जनता सहन करणार नाही. त्यामुळे हे भाजपचं हुकूमशाहीचे दुकान जनता येणाऱ्या काळात नक्कीच बंद करेल, अशी प्रतिक्रिया माजी महिला आणि बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा: