मुंबई : राष्ट्रवादीच्या निवड समितीने राजीनाम्याबाबतचा ठराव फेटाळल्याची माहिती काँग्रेस नेते प्रफुल पटेल, अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, छगन भुजबळ आदी नेत्यांनी सिल्वर ओकवर शरद पवारांना दिली. त्याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती प्रफुल पटेल यांनी पवारांना केली आहे. मात्र, थोडा वेळ द्यावा, असे शरद पवारांनी सांगितल्याची माहिती प्रफुल पटेल यांनी दिले. छगन भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, की कार्यकर्त्यांच्या भावना त्यांना सांगितल्या आहेत. दुसरीकडे अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक आज सकाळी 11 वाजता सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे नेते मुंबईतील प्रदेश कार्यालयात दाखल झाले आहेत. शरद पवारांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आजही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आग्रही आहेत. पवारांचा राजीनामा मंजूर करण्याचा प्रस्ताव प्रफुल पटेल मांडण्यात आला समोर येत आहे. निवड समितीने शरद पवारांचा राजीनामा फेटाळला आहे. दुसरीकडे पक्षाचे कार्यकर्ते अद्यापही राजीनामा मागे घ्यावा, यासाठी आग्रही आहेत. कार्यकर्त्याने कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची माहिती समोर येत आहे.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले, की पवारांनीच अध्यक्ष पदी राहण्याचा बैठकीत प्रस्ताव मांडला जाणार आहे. त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करणार आहोत. त्यांनी ऐकले नाही तर त्यांच्या घरासमोर उपोषण करणार आहोत. दुसरीकडे कार्यकर्त्यांनी राजीनामा मागे घ्या, अशी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. आता सुप्रिया सुळे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या केंद्रीय अध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. गेल्या पंधरा वर्षापासून सुप्रिया सुळे या केंद्रीय स्तरावर खासदार म्हणून काम करत आहेत. छगन भुजबळ यांच्या नावाची सुद्धा या पदासाठी चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबद्दल शक्यता नाकारली आहे. अजित पवार यांना देखील अध्यक्ष म्हणून घोषित केले जावू शकते, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षस्थानी कोण असणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शरद पवारांच्या निर्णायामुळे कार्यकर्ते भावूक : 'लोक माझे सांगाती' आत्मकथेच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशनप्रसंगी शरद पवारांनी त्यांच्या राजीनाम्याची घोषणा केली. अनेक राजकीय नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवृत्तीच्या निर्णयाला विरोध केला. बऱ्याच नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी राजीनामे देखील दिले. त्यांच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णयावरून कार्यकर्ते खूप भावूक झाले होते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना त्यांचा निर्णय मागे घेण्याचे आवाहन देखील केले गेले होते. शरद पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून आली आहे.
महाराष्ट्राचे मोठे नुकसान : शरद पवार यांच्या राजीनाम्यामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच राष्ट्रवादीही कमकुवत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जनतेसाठी त्यांनी आपला निर्णय मागे घ्यावा, अशी प्रतिक्रिया त्यांची बहिण सरोज पाटील यांनी दिली. शरद पवार यांचे देशात लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मोठे योगदान असल्याची प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली होती. अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतरही शरद पवार यांना राजकारणात महत्त्वाचे स्थान असेल, असे पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते. शरद पवारांच्या राजीनाम्यावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, त्यांच्या राजीनाम्याचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही.