मुंबई - राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा शुक्रवारी (30 जून) वाढदिवस आहे. महाराष्ट्राची नस ओळखणारे आणि राष्ट्रीय राजकारणातही महत्त्वाची भूमिका बजावणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत. राजकारणाचा वारसा असतानाही सुप्रियांनी स्वबळावर आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे.
सुप्रिया सुळे यांचे शालेय शिक्षण : सुप्रिया सुळे या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या आहेत. सुप्रिया सुळे यांचे शिक्षण पुण्यातील नाना चौकातील सेंट कोलंबस हायस्कूलमध्ये झाले. बारावीनंतर सुप्रिया सुळे यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील पदवी प्राप्त केली. त्यावेळी शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री होते. पवार मुख्यमंत्री असताना सुप्रिया सुळे मात्र, बसने कॉलेजला जात होत्या. त्यांना दररोज दहा रुपय पॉकेट मनी दिले जायचे.
सुप्रिया सुळे यांचे वैवाहिक जीवन - महाविद्यालयीन जीवनातच सुप्रिया यांचा सदानंद सुळे यांच्याशी कौटुंबिक कार्यक्रमात संपर्क आला. या ओळखीनंतर सुप्रिया यांनी सदानंद सुळे यांच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला. तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखराव आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने या दोघांचे लग्न करण्यात आले. लग्नानंतर सुप्रिया सुळे आपल्या नवऱ्यासोबत परदेशात गेल्या. परदेशात असताना त्यांनी कॅलिफोर्नियातील बर्कले विद्यापीठातून जलप्रदूषण या विषयात पदव्युत्तर पदविका धारण केली. त्या काही काळ सिंगापूर आणि इंडोनेशियातील शहरांमध्ये राहिल्या. त्यानंतर त्या भारतात परतल्या. सुप्रिया सुळे यांना रेवती आणि विजय अशी दोन अपत्ये आहेत.
राजकारणात सुप्रिया सुळेंची एन्ट्री - भारतात परतल्यानंतर 2006 मध्ये त्या राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून गेल्या. त्यानंतर 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली, यावेळी साडेतीन लाख मतांनी त्या विजयी झाल्या. 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभांच्या निवडणुकांमध्ये सुप्रिया यांनी विजय मिळवला. सोळाव्या लोकसभेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या सुप्रिया एकमेव खासदार होत्या. त्यांनी पाच वर्षात संसदेत 1176 प्रश्न उपस्थित केले होते.
राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना : महिलांनी अधिकाधिक राजकारणात यावे यासाठी सुप्रिया सुळे यांनी 2012 मध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेस हे व्यासपीठ निर्माण केले. या माध्यमातून त्यांनी अनेक तरुण महिलांना राजकारणात येण्याची संधी दिली. या माध्यामातून सुप्रिया सुळे यांनी तरुणांचे विविध प्रश्न मार्गी लावले आहेत.
हेही वाचा -