मुंबई - सत्तास्थापनेच्या संघर्षाला रात्रीच्या अंधारात पूर्ण विराम मिळाला असला तरी संशयकल्लोळ मात्र कायम आहे. राष्ट्रवादीतून फुटून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेले नेते अजित पवार यांच्यासोबत नेमके कोणते आमदार आहेत याची चाचपणी सुरू आहे. अजित पवार यांचे निकटवर्तीय खासदार सुनील तटकरे राष्ट्रवादीच्या गोटात उभे राहूनही निशब्द असल्याचे चित्र पहायला मिळाल्याने चर्चांना उधान आले आहे.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. सकाळी राजभवनावर अजित पवार यांच्यासोबत 10 ते 12 आमदार उपस्थित असल्याची माहिती स्वतः शरद पवार यांनी यावेळी दिली. या पत्रकार परिषदेला अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे खासदार सुनील तटकरे हेही हजर होते. त्यांच्या कन्या अदिती तटकरे या श्रीवर्धनच्या आमदार आहेत. दरम्यान, अदिती यांनीदेखील बंडखोरी केल्याचे वृत्त आहे.
हेही वाचा - संघाने स्वयंसेवकांना 'हे'च नैतिकतेचे धडे दिले का? - संजय राऊत
पत्रकार परिषदेनंतर अजित पवारांविषयी प्रश्न केले असता सुनील तटकरे यांनी माध्यमांना दुर्लक्षित केल्याचे पहायला मिळाले. काहीही प्रतिक्रीया न देता ते गाडीत बसून निघून गेले. त्यांच्या अशा वागण्यामुळे राजकीय वर्तुळात संशयकल्लोळ माजला आहे.