सातारा: आमदार सांभाळण्यासाठी शासकीय तिजोरीवर सरकारने दरोडा टाकला असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादीचे विधान परिषद आमदार शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केला. शिंदे-फडणवीस सत्तेवर सरकार आल्यापासून विकास निधीबाबत अन्याय व विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. या निषेधार्थ गुरूवारी (दि. २३ फेब्रुवारी) जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेधसाठी लाठी मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आमदार शिंदे यांनी दिली.
विकास निधीमध्ये राजकारण: आमदार शाशिकांत शिंदे म्हणाले की, सातारा हा दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्याचे अनेकांनी नेतृत्व केले. पण सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचे राजकारण जिल्ह्यात झाले आहे. सध्या शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर आल्यापासून विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. विकास निधीबाबत राजकारण केले जात आहे. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
अधिकाऱ्यांचे पक्षपाती काम: प्रशासकीय अधिकाऱ्यांवर पक्षपातीपणाचा आरोप करत आमदार शिंदे म्हणाले की, सरकार बदलल्यानंतर प्रशासकीय अधिकारी पक्षपाती काम करत आहेत. विरोधकांचा आवाज दाबला जात आहे. या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने गुरूवारी (दि. २३) बॉम्बे रेस्टॉरंट ते जिल्हाधिकारी कार्यालय असा निषेधसाठी लाठी मोर्चा काढण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा: मेडिकल कॉलेजच्या भंगार चोरीबाबत कारवाईचे आश्वासन देऊनही अद्याप दाखल केलेला नाही. भंगार चोरणाऱ्यांशी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे साटेलोटे असल्याचा आरोप आमदार शिंदे यांनी केला. सध्या शेतकऱ्यांची वीज कनेक्शन तोडण्यात येत आहेत. या सर्व बाबींवर आवाज उठविला जाणार आहे. अधिकारी सत्ताधाऱ्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले बनले आहेत. सुडबुद्धीने एकतर्फी वागत आहेत, या विरोधात लाठी मोर्चाद्वारे आवाज उठविला जाणार असल्याचे शिंदे यांनी सांगितले.
ठाकरेंना सामान्य जनतेची सहानभूती: आमदार शिंदे पुढे म्हणाले की, सर्वसामान्य शिवसैनिकांना आता ज्या घडमोडी घडलेल्या आहेत, त्या पटलेल्या नाहीत. आताचे जे राजकारण सुरु आहे ते दबावाचे आहे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जो निर्णय दिला आहे त्यामुळे उद्धव ठाकरे यांना सामान्य जनतेची मोठी सहानभूती मिळत आहे. त्यातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वक्तव्याने तर त्यात आणखी भर पडली असल्याची त्यांनी सांगितले. तसेच 2024 च्या विधानसभा-लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता नोव्हेंबर किंवा डिसेंबरपर्यंत लागण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.
आमदार महेश शिंदेंवर टीका: आमदार शिंदे म्हणाले की, मी आहे येथेच आहे. मी कोठेही जाणार नाही, माझी विरोधकांनी धास्ती घेतल्याने ते आता माझ्याबाबत चर्चा करु लागले आहेत. माझाच प्रचार ते करतील अशी चर्चा करत असल्याने ते राष्ट्रवादीत येतील काय हेही सांगता येत नाही. मला कोरेगावातील एकाधिकार शाही मोडित काढायची आहे, अशा शब्दात त्यांनी नाव न घेता विद्यमान आमदार महेश शिंदे यांच्यावर टीका केली आहे.