मुंबई Prajakt Tanpure : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांच्यावर ईडीनं १३ कोटी ३७ लाख रुपयांच्या मनी लाँड्रिंगचा ठपका ठेवला आहे. साखर कारखान्याच्या संदर्भात व्यवहार करताना हा घोटाळा झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. आता या संदर्भात मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाचे न्यायमूर्ती आर एन रोकडे यांनी प्राजक्त तनपुरे आणि अन्य आमदारांना १२ जानेवारीला न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावलं.
या आमदारांना बजावलं समन्स : राम गणेश गडकरी साखर कारखाना विक्री दरम्यान कोट्यावधी रुपयांचा घोटाळा झाला. तसेच यामध्ये मनी लाँड्रिंगही झालं, असं ईडीचं म्हणणं आहे. या संदर्भात आमदार प्राजक्त तनपुरे, आमदार प्रसाद तनपुरे, आमदार सुभाष देशमुख आणि आमदार रणजीत देशमुख यांना समन्स बजावण्यात आला. या आमदारांसह प्रसाद शुगर अलाईड आणि अॅग्रो प्रॉडक्ट लिमिटेड तसेच तक्षशिला सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या प्रमुखांनाही न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे.
ईडीचा आरोप काय : ईडीच्या आरोपांनुसार, राम गणेश गडकरी साखर कारखाना जेव्हा विकल्या गेला, तेव्हा बाजारभावानुसार त्याची किंमत २६ कोटी ३२ लाख रुपये एवढी होती. मात्र हा साखर कारखाना केवळ १२ कोटी ९५ लाख रुपयांमध्येच विकला गेला. यामध्ये १३ कोटी ३७ लाख रुपयांचा बेकायदेशीर आर्थिक व्यवहार झाल्याचं ईडीचं म्हणणं आहे. ईडीनं राम गणेश गडकरी साखर कारखान्याची ११० एकर जागा गिळंकृत केल्याचाही आरोप केला आहे. याबाबत मुंबईतील महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकनं एमआरए मार्ग पोलीस ठाण्यामध्ये मूळ गुन्हा दाखल केला होता. ईडीनं या गुन्ह्याच्या आधारे ईसीआयआर नोंदवलेला आहे.
हे वाचलंत का :