मुंबई - गेल्या आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. यावेळी केंद्र सरकारकडून नवं सहकार खात्याचे निर्माण करण्यात आलेले आहे. हे सहकार खातं खुद्द अमित शाह हे पाहणार आहेत. त्यामुळे सहकार खात्याची संबंधित असलेले नेते आणि पक्ष यांना आता भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून भीती दाखवली जात आहे, असा आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे.
महाराष्ट्र राज्यात सहकार विभागात खास करून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची पाळंमुळं रुजली आहेत. मात्र आता अमित शाह यांनी सहकार खात्याचे केंद्रीय मंत्री पद स्वतःजवळ ठेवले आहे. त्यामुळे सहकार खात्याची संबंधित लोकांचे आता काही खैर नाही, असे भाजपाचे नेते राज्यभर बोलत फिरत आहेत, असा थेट आरोप नवाब मलिक यांनी केला. भाजपा नेत्यांच्या असं वक्तव्य हे बेजबाबदार आहे अशी टीका देखील नवाब मलिक यांनी केली. ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते.
याआधी सहकार हा विभाग कृषी खात्याच्या अधीन येत होता. कृषिमंत्री सहकार विभागाबद्दल सर्व निर्णय घेत होते. सहकार विभागात काही राज्यात एकत्रित व्यवहार असल्यास केंद्र सरकारकडून हस्तक्षेप व्हायचा. मात्र आता सहकार खातच केंद्र सरकारकडे गेल्यामुळे भाजपाच्या नेत्यांकडून सहकार विभागात असलेल्या नेत्यांना थेट धमकीचं दिली जात आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत केला.
सहकारला संपवण्याचे काम कोणी केलं तर, त्या विरोधात उभे राहावे लागेल
सहकार विभाग हा एक स्वायत्त विभाग असावा, यासाठी कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी मोठे योगदान दिले आहे. सहकार विभागात राजकीय हस्तक्षेप होऊ नये यासाठी 97 वी घटना दुरुस्ती देखील करण्यात आली असल्याची माहिती नवाब मलिक यांनी या पत्रकार परिषदेतून दिली. मात्र आता जर कोणी, सहकार क्षेत्र संपवण्याचा घाट घालत असेल तर, त्याच्या विरोधात सर्वांनी एकत्र येऊन उभा करावा लागेल, असा इशाराही नवाब मलिक यांनी दिला आहे.
तो दाढीवाला कोण? आशिष शेलार यांनी सांगावं
सहकार विभाग हे अमित शाह यांना देण्यात आल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मंत्री आशिष शेलार यांनी "चोर के दाढी मे तीनका" असं म्हटलं होतं. त्यामुळे तो दाढीवाला कोण? हे आशिष शेलार यांनी स्पष्ट करावं असे म्हणत भारतीय जनता पक्षाला नवाब मलिक यांनी खोचक टोला लगावला आहे.
हेही वाचा - खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका