मुंबई - अधिवेशन कामकाजामध्ये आज जलयुक्त शिवार, शेततळी, महापरीक्षा पोर्टल यासारख्या मुद्द्यांवर देवेंद्र फडणवीस सरकारच्या कामकाजावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार टिका केली.
जलयुक्त शिवारच्या माध्यमातून १५ हजार गावे दुष्काळमुक्त झालीत, मग २५ हजार गावे दुष्काळग्रस्त का? ६२ हजार शेततळी बांधल्याचा फडणवीस सरकारने दावा केला. त्याचा दुष्काळग्रस्त भागाला लाभ होणार असल्याचे सुद्धा सांगितले. मात्र, प्रत्याक्षत ही शेततळी बांधली असती तर राज्यावर दुष्काळाची भयानक वेळ आली नसती. महापरीक्षा पोर्टलबाबत स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी तक्रार करत आहे. यामध्ये सामूहिक कॉपी व भ्रष्टाचार झाल्याची असंख्य उदाहरणे व तक्रारी आल्या आहेत. अशा बदनाम पोर्टलचा व वरील विषयांचा राज्यपाल भाषणात गौरवपूर्ण उल्लेख करत असतील तर आता देवसुद्धा देवेंद्र फडणवीस सरकारला वाचवू शकणार नाही. असा इशारा, जयंत पाटील यांनी दिला आहे.
राज्यसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना जयंत पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली होती. सरकारच्या कारभारावर व राज्यपालांनी मांडलेल्या मुद्द्यावर त्यांनी कडाडून टीका केली. शिवाय सरकारमधील जुन्या नव्या मंत्र्यांना व शिवसेनेच्या मंत्र्यांचे चिमटे सुद्घा काढलेत.
गेल्या पाच वर्षांत राज्यपालांनी जी भाषणे केली त्यामधील सगळ्या भाषणात ‘माझ्या सरकारने हे करायचे ठरवले आहे’, ‘माझ्या सरकारने ते करायचे ठरवले आहे’ या व्यतिरिक्त महामहीम राज्यपाल दुसरे काहीही बोललेले नाहीत. केवळ आणि केवळ यांचे सरकार काय करणार आहे, हेच राज्यपालांनी सांगितले आहे. तुम्हाला सगळ्यांना इथे का बोलावले याचा या भाषणांमध्ये कुठेही उल्लेख नाही आणि असलाच तर तो एका ओळीत आहे, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.