मुंबई - मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात तयार होणाऱ्या जैविक कचऱ्याचे निर्जंतुकीकरण त्याच ठिकाणी केली जाणार आहे. त्यासाठी पालिकेने जैविक कचरा निर्जंतुकीकरणासाठी मायक्रोवेव्ह प्रणाली उपयोगात आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पालिका ४१ मायक्रोवेव्ह खरेदी करणार असून त्यासाठी १४ कोटींचा खर्च करणार आहे. रुग्णालयातील कचरा गोवंडी शिवाजी नगर येथील एसएमएस कंपनीत विल्हेवाट लावण्यासाठी स्थानिक नागरिकांचा विरोध आहे. त्यासाठी हा जैविक कचरा इतर ठिकाणी न नेता त्याच ठिकाणी विल्हेवाट लावावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या गटनेत्या राखी जाधव यांनी केली.
पालिकेला ४ वर्षाने आली जाग -
मुंबई महापालिकेच्या केईएम, सायन, नायर, कूपर या प्रमुख रुग्णालयांसह उपनगरीय रुग्णालये आणि खासगी रुग्णालयात निर्माण होणारा जैविक कचरा 'एसएमएस' या कंपनीच्या मार्फत गोळा करून त्याची ज्वलशील भट्टीत जाळून विल्हेवाट लावण्यात येते. वास्तविक पाहता केंद्र सरकारने २०१६ रोजी एक अद्यादेश काढून जैविक कचरा रुग्णालयात निर्जंतुकीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यावर गेले ४ वर्षे गप्प बसलेल्या मुंबई महापालिकेला उशिराने जाग आली व आता पालिकेच्या रुग्णालयात त्याबाबत अंमलबजावणी करण्यासाठीचा प्रस्ताव आज स्थायी समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे.
१४ कोटी रुपयांचे कंत्राट -
सदर प्रस्तावानुसार, पालिकेच्या प्रमुख व उपनगरीय रुग्णालयात दररोज निर्माण होणारा रक्त नमुन्याच्या बाटल्या, मानवी शरीराचे भाग आदी प्रकारचा जैविक कचरा गोवंडी शिवाजी नगर येथील एसएमएस कंपनीच्या ज्वलनशील भट्टीत विल्हेवाट लावण्यासाठी जाण्यापूर्वी त्याचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा पुरवठा करणे, त्याची उभारणी करणे आणि त्याची चाचणी घेऊन ते कार्यान्वित करण्याचे तब्बल १४ कोटी रुपयांचे कंत्राटकाम मे. सन्मित इन्फ्रा लिमिटेड या कंत्राटदाराला देण्यात आले आहे. पालिकेच्या रुग्णालयात ४१ नग मायक्रोवेव्ह आधारित प्रणालीचा पुरवठा करण्यासाठी प्रति नग किमान ३४ लाख ५५ हजार रुपये याप्रमाणे कंत्राटदाराला १४ कोटी १६ लाख ५८ हजार ४६ रुपये पालिका मोजणार आहे. यामध्ये, प्रारंभी एका वर्षाच्या प्रचलन कामाचा खर्च ५३ लाख ७० हजार रुपये तर पुढील पाच वर्षांसाठी १ कोटी ७३ लाख रुपये एवढा खर्च अंतर्भूत आहे.
जैविक कचऱ्याची रुग्णालयातच विल्हेवाट लावावी - राष्ट्रवादी
पालिका रुग्णालयात निर्माण होणाऱ्या जैविक कचऱ्याचे निर्जंतुकीकरण रुग्णालयातच करावे आणि त्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट तेथेच लावण्यात यावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी यावेळी झालेल्या चर्चेप्रसंगी केली. तसेच सध्या रुग्णालयातील जैविक कचरा ज्या एसएमएस कंपनीत विल्हेवाट लावण्यासाठी पाठवला जातो. त्या देवनार परिसरातील प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध आहे. त्यामुळे रुग्णालयातील हा जैविक कचरा एसएमएस कंपनीत पाठवण्याचा वाहतूक व इतर खर्च वेगळा आणि या कचऱ्याचे निर्जंतुकीकरण करण्याचा खर्च वेगळा होणार असल्याने ही आणखीन खर्चिक बाबा लक्षात घेता पालिकेने त्यापेक्षा त्या त्या रुग्णालयातच त्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावावी, अशी मागणी राखी जाधव यांनी केली. मात्र त्यानंतरही सदर प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
हेही वाचा - रंगभूमीवर बालनाट्य बंद आणि मंत्रालयात बालनाट्य सुरू - आशिष शेलार
हेही वाचा - 'म्हाडा वसाहतीच्या गृहनिर्माण संस्थांना सेवा शुल्कावर सुट देण्यासंदर्भात घेणार सकारात्मक निर्णय'