मुंबई : राज्यातून एका मागोमाग एक प्रकल्प गुजरात तसेच इतर राज्यात जाण्याच्या मुद्द्यावरून विरोधक आक्रमक झाले असताना राज्यातला अजून एक प्रकल्प मध्यप्रदेश राज्यात गेल्याचा आरोप राज्य सरकारवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी लावला आहे. राज्यातील एकापाठोपाठ एक प्रकल्प राज्याबाहेर जात असून ते थांबवण्यात शिंदे - फडणवीस सरकार अपयशी ठरले आहे, फक्त पोकळ घोषणा करण्यापलीकडे शिंदे - फडणवीस सरकारला काहीच येत नाही, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे ( Mahesh Tapase critics on state government ) यांनी केली आहे.
मध्येप्रदेशमध्ये प्रकल्प गेल्यावरून टीका - वेदांत फॉक्सकॉनसारखा प्रकल्प राज्याबाहेर घालवल्यानंतर आता आणखी एक ऊर्जा उपकरण निर्मिती प्रकल्प मध्यप्रदेशमध्ये गेला असून महेश तपासे यांनी शिंदे - फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर एक - एक प्रकल्प राज्याबाहेर जाण्याचा सपाटा सुरू झाला आहे. वेदांत फॉक्सकॉन, टाटा एअरबस, मेडिकल डिव्हाईस पार्क, बल्कड्रग पार्क आणि आता ऊर्जा उपकरण निर्मिती झोन हा देखील प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याचा आरोप महेश तपासे यांनी केला आहे.
नवीन प्रकल्प राज्याबाहेर का गेला? - हे सर्व प्रकल्प राज्याबाहेर जाण्यापासून थांबवण्यामध्ये शिंदे - फडणवीस सरकार अपयशी ठरले असल्याचा ठपका देखील महेश तपासे यांनी सरकारवर ठेवला आहे. राज्यात रोजगार कसा निर्माण करणार याचे उत्तर मुख्यमंत्री किंवा उद्योगमंत्री यांच्याकडे सध्या स्थितीत नाही. राज्याला औद्योगिक विकास वाटेवर कसे आणणार आणि नवीन प्रकल्प राज्याबाहेर का गेला? याचेही उत्तर शिंदे - फडणवीस यांनी जनतेला द्यायला हवे, अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.