मुबई : नवाब मलिक यांनी केलेल्या याचिकेत अशी मागणी केली आहे की, अटक बेकायदेशीर असून मला ताबडतोब सोडण्यात यावे. मलिकांच्या अटकेविरोधातील याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे. ही सुनावणी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. शुक्रे आणि न्यायमूर्ती सानप यांच्या खंडपीठापुढे होणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांना ईडीने अंडरवर्ल्डशी संबंध आणि मनी लॉंड्रिंग प्रकरणात अटक केली आहे. यानंतर ईडीने नवाब मलिकांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले होते. यानंतर आता नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिकला ईडीने चौकशीसाठी समन्स पाठवले आहे. नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए कोर्टाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत दिलेल्या ईडी कोठडीला आव्हान दिले गेले आहे. मलिकांच्यावतीने याचिकेच्या माध्यमातून राजकीय हेतूसाठी केंद्रीय तपासयंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कुख्यात गुंड दाऊदशी संबंध आणि मनी लॉंड्रिंगप्रकरणात मलिकांना ईडीने अटक केले आहे. मालमत्ता खरेदी आणि गैरव्यवहार प्रकरणात मलिकांना संबंध असल्याचा आरोप ईडीने केला आहे. यामध्ये आता मलिकांच्या कुटुंबातील सदस्यांना ईडीने समन्स पाठवण्यास सुरुवात केली आहे. मलिकांच्या अटकेच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचे भाऊ कप्तान मलिक यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. नवाब मलिक यांचा मुलगा फराज यालादेखील ईडीने समन्स पाठवले आहे.
मलिक यांना 23 फेब्रुवारीला ईडीने अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयाने मलिकांना 8 दिवसांची ईडी कोठडी सुनावली होती. नबाब मलिक यांनी दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, ईडीने केलेली अटक बेकायदेशीर आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या पीएमएलए कोर्टाने मलिकांना कोठडीत ठेवण्याचा आदेश अधिकार क्षेत्राशिवाय दिलाा, असा दावाही याचिकेत करण्यात आला आहे. आता यावर लगेच सुनावणी का व्हावी? यासाठी उच्च न्यायालयाने मलिक यांच्याकडून स्पष्टीकरण मागितले आहे.
नवाब मलिक यांचे वकिल अॅड. तारक सय्यद आणि कुशल मोर यांनी याचिकेवर तातडीने सुनावणी करण्याची न्यायालयाकडे मागणी केली होती. त्यावर न्यायमूर्ती पी. बी. वराळे आणि एस. पी. तावडे यांच्या खंडपीठाने उद्याच्या उद्या का सुनावणी व्हावी, यासाठी स्पष्टीकरण द्या असे सांगितले आहे. तसेच आज स्पष्टीकरण देण्याचे निर्देश दिले आहेत. अन्यथा योग्य खंडपीठासमोर सुनावणीसाठी जाण्याचा सल्ला दिला आहे.
अटक झाल्यापासूनचा घटनाक्रम-
ईडी 23 फेब्रुवारीला पहाटेच नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाली होती. त्यानंतर सकाळी सातच्या दरम्यान मलिक यांना ईडी कार्यालयात आणण्यात आले. तब्बल सात तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. त्यानंतर मलिक यांची जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्याचदिवशी रात्री उशिला पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना 3 मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावली. नंतर मलिक यांच्या पोटात दुखत असल्यामुळे जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांना अखेर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून, आता ते ईडी कोठडीत आहेत.