मुंबई - दहशतवादाचे आरोप असलेल्या साध्वी प्रज्ञा सिंह यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर आता तिच्यावर अत्याचार झाल्याची बोंब भाजप ठोकत आहे. मात्र, त्यांच्याच शिवराज सिंह सरकारने म्हणजेच भाजपने याच साध्वीवर खुनाच्या आरोपाचा पहिला गुन्हा नोंदवला होता. याचा भाजपला विसर पडला की काय, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी भाजपला केला. ते आज मुंबईत बोलत होते.
साध्वी प्रज्ञा सिंह हिने काही दिवसांपूर्वी अत्यंत आक्षेपार्ह असे विधान करून वीरमरण पत्करलेले हेमंत करकरे यांच्यासह देशाचाही अवमान केला. तर दुसरीकडे भाजपने, साध्वीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या इशाऱ्यानंतरच गुन्हा दाखल करण्यात आला होता, असा आरोप केला आहे. याला उत्तर देताना नवाब मलिक यांनी भाजपची पोलखोल केली.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर आपल्याच एका सहकाऱ्याचा खून केल्याचा गंभीर आरोप होता. त्यासाठी पहिल्यांदा भाजपच्या शिवराज सिंह सरकारने गुन्हा दाखल करून तिला अटक केली होती. त्यामुळे ती साध्वी नसून गुन्हेगार असल्याचे यामुळेच समोर आले होते. याचाही भाजपला विसर पडला आहे. दहशतवादाचे आणि आपल्याच सहकाऱ्याचे हत्येचे आरोप असलेल्या गुन्हेगार व्यक्तीला उमेदवारी देवून भाजपने आपला खरा चेहरा दाखवला असल्याचेही मलिक म्हणाले.
भाजपने एकीकडे दहशतवादाच्या विरोधात बोलून दुसरीकडे त्या
चे समर्थन साध्वीला तिकिट देवून केलेले आहे. ज्यांनी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. त्या हेमंत करकरे यांच्याबद्दल साध्वीने जे विधान केले त्यातूनच भाजपच्या खोट्या देशप्रेमाचा बुरखा फाटला असल्याचे मलिक म्हणाले.
मालेगाव बाँबस्फोटानंतर साध्वीच्या मोटारसायकलची ओळख पटली होती. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे प्रमख मोहन भागवत यांच्या हत्त्येचा कट रचल्याचे आणि देशात समांतर सरकार स्थापन करण्यासाठी नेपाळ, इस्राईल आदी देशाची मदत घेणार असल्याचे पुरावे साध्वीच्या लॅपटॉपमधून समोर आले होते. यामुळेच संघाने त्यावेळी पत्र लिहून साध्वीवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली होती.
मात्र, आता भाजपाला केवळ मते मिळविण्यासाठी साध्वीसारख्या दहशतवादाचे आरोप असलेल्या व्यक्तीला समोर आणावे लागले. देशातील जनता दहशतवाद्यांना उमेदवारी दिलेल्या भाजपला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नसल्याचे मलिक म्हणाले.