मुंबई - 'मुर्दा लोग पानी के साथ बह जाते है,' असे म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सचिन अहिर यांच्या शिवसेना प्रवेशावर निशाणा साधला. 'जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरूद्ध तैरते है', असेही ते म्हणाले.
तब्बल ३ वेळा मुंबई राष्ट्रवादीचे अध्यक्ष राहिलेले सचिन अहिर यांनी आज राष्ट्रवादी सोडचिठ्ठी देऊन शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी 'मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं' असे म्हणत अहिर यांच्यावर निशाणा साधला. शिवसेनेने आमचा पडणारा नेता पळवला, आम्ही त्यांच्या तीन जागा कमी करू असेही नवाब मलिक म्हणाले.
मलिक यांच्या वक्तव्याचे मुंबईतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी, युवक, युवती आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. मुंबईत आता आपण पुढाकार घ्यावा, आम्ही आपल्यासोबत आहोत असा संदेशही दिला.
नेमके काय म्हणाले नवाब मलिक ट्विटमध्ये -
"जो जिंदा होते हैं वह प्रवाह के विरूद्ध तैरते हैं,
मुर्दा लोग पानी के साथ बह जाते हैं।
साथियों जिंदा हो तो जिंदा नज़र आना ज़रूरी है।
जयहिंद जय राष्ट्रवाद।"
मलिक यांच्या या ट्विटवर अहिर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे. येत्या काळात अहिर विरूद्ध राष्ट्रवादी असे वाद अधिक निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.